Industry Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Industry Fuel Crisis: इंधन टंचाईतही पिंपरी-चिंचवड उद्योगांचा ‘इलेक्ट्रिक’ पर्याय

युद्धपरिस्थितीतही उत्पादन सुरू; स्थानिक इनोव्हेशनमुळे उद्योगांना नवी दिशा

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिंपरी: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध परिस्थितीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांवरही परिणाम होत आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतून सकारात्मक चित्र समोर येत असून, संकटातही संधी शोधून येथील उद्योजकांनी इंधन टंचाईवर पर्याय उपलब्ध करत आपल्या उत्पादनाचा वेग कायम ठेवला आहे.

टंचाईतून इलेक्ट्रिककडे वाटचाल

इंधन तसेच गॅसच्या टंचाईमुळे उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे.गॅसवर चालणाऱ्या मशिन्स आता विद्युत यंत्रणेवर परिवर्तित केल्या आहेत. मशिन परिवर्तित करण्यासाठी सुरुवातीला मोठा खर्च करावा लागत आहे.मशिन गरम होणे आणि तांत्रिक अडचणी येत आहेत.तरीही पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर आहे.ऊर्जा कार्यक्षमतेसाठी प्रयोग सुरू आहेत.ही वाटचाल भविष्यातील स्थिरतेसाठी महत्त्वाची ठरते आहे;मात्र उत्पादन थांबण्याऐवजी ते कमी प्रमाणात का होईना, ते सुरु ठेवल्याचे उद्योजक सांगतात.

संघर्षातून निर्माण होतेय नवे उद्योग मॉडेल

शहर परिसरातील उद्योग नव्या टेक्नॉलॉजीकडे वळताना दिसत आहेत. इंधन तसेच गॅस टंचाईतून मार्ग काढून ऑटोमेशन आणि डिजिटल प्लॅनिंगचा वापर वाढतो आहे. याच संकटातून स्थानिक उत्पादनाला नवसंजीवनी मिळत असल्याचे उद्योजक सांगत आहेत. मशिनरी चालविण्यासाठी विविध ऊर्जा पर्यायांचा शोध घेतला जात आहे. ग्लोबल संकटातून लोकल इनोव्हेशन जन्म घेत आहे. त्यामुळे भविष्यातील उद्योग अधिक सक्षम बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

लेबर कमी; पण टीमवर्क वाढले

इंधन तसेच गॅस टंचाईमुळे काही काळ उत्पादनावर परिणाम झाला. कामाच्या अनिश्चिततेमुळे अनेक कामगारांनी काम सोडले. सध्या उपलब्ध मनुष्यबळावरच काम सुरु ठेवावे लागत आहे. उपलब्ध मनुष्यबळाकडूनच विविध कामे मार्गी लावली जात आहेत; तसेच स्वत: उद्योजकही मशिनरी हाताळत आहेत.

उत्पादन प्रक्रियेत स्थिरता

पूर्वी मेटल थ्रिड, वेल्ड शायनिंग वर्कसाठी इंजिन डिझाइनसाठी इंधनावर चालणारी मशिन होती; त्याऐवजी सध्या इलेक्ट्रिकवर चालणारी आधुनिक मशीन आम्ही वापरत असून. त्याच कामासाठी अधिक कार्यक्षमतेने मशिन काम करत आहे. या बदलामुळे उत्पादन प्रक्रियेत स्थिरता असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

आवाज अन्‌‍ प्रदूषणात घट

इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक मशीनचा ऑपरेटिंग खर्च लक्षणीयरीत्या कमी होत असल्याने उद्योगांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर देखभाल खर्चातही घट झाली आहे. इलेक्ट्रिक तंत्रज्ञानामुळे आवाज आणि प्रदूषण कमी होत असल्याने पर्यावरणीय दृष्टीनेही हा बदल सकारात्मक मानला जात आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून इलेक्ट्रिक मशीन अधिक किफायतशीर ठरत असून उद्योग स्मार्ट व ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान स्वीकारत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

इम्पोर्ट अडचणीत; स्थानिक पर्यायांचा शोध

अनेक कंपन्यांत उत्पादित होणाऱ्या मालासाठी काही पार्ट हे परदेशातून मागविले जातात; मात्र युद्धस्थितीमुळे येणाऱ्या पार्ट्समध्ये विलंब वाढल्याने उत्पादन साखळी विस्कळीत झाली आहे.अनेक उद्योगांना आवश्यक कॉम्पोनंट वेळेत मिळत नसल्याने ऑर्डर्स अडकत आहेत.यावर उपाय म्हणून उद्योजक स्थानिक सप्लायर्सचा शोध घेत आहेत.काही ठिकाणी इन-हाऊस पार्ट मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्यात येत आहे.डिझाईनमध्ये बदल करून उपलब्ध पार्ट्स वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे.पुरवठा साखळीचा पुनर्विचार केला जात आहे.

कच्चा माल महाग: ‌‘स्मार्ट मॅनेजमेंट‌’चा आधार

रॉ मटेरियल आणि इंधनाच्या टंचाईमुळे उत्पादन खर्च वाढला आहे.पूर्वीच्या तुलनेत प्रति टन खर्चात मोठी वाढ झाली आहे. उद्योगांनी खर्च नियंत्रणासाठी नव्या पद्धती अवलंबल्या आहेत. वेस्टेज कमी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. मार्केटमध्ये नफा कमी असला तरी संकटाच्या परिस्थितीत टिकाव धरण्याची रणनीती उद्योजकांकडून वापरली जात आहे.

उत्पादनासाठीच्या कच्च्या मालाचे दर वाढले, व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्या आहेत.तरीही आम्ही काही मशीन विद्युत यंत्रणेवर चालवायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये अनेकदा संकटाचा सामना करावा लागतो. काही वेळा नुकसानही झाले. सुरुवातीला अडचणी आल्या, पण हळूहळू त्यातून मार्ग निघतोय. आम्ही कोणत्याही संकटाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकत्र मिळून काम करत आहोत; तसेच उत्पादनावर फरक पडून देणार नाही. सध्या संघर्ष आहे, पण थांबायचं नाही हे ठरवलं आहे.
राम राजपूत, उद्योजक
आम्ही उत्पादित करणाऱ्या उत्पादनांसाठी काही पार्ट्स परदेशातूनच मागवावे लागतात; परंतु युध्दाचा काळात ते वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही स्थानिक पर्याय शोधण्यावर तसेच बदल करण्यावर भर देत आहोत. प्रत्येक संकटांवर मात करत आम्ही एकत्रित काम करत आहोत अडचणी आहेत; मात्र काम थांबलेले नाही.
दामाजी आसबे, उद्योजक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT