

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य पोलिस दलाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह (डीजी इन्शिग्निया) पुरस्कारासाठी आयुक्तालयातील आठ जणांची निवड जाहीर झाली आहे.
या यशामुळे आयुक्तालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण दलासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.दरवर्षी उत्कृष्ट सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि गुन्हे तपासातील प्राविण्य यासाठी हा सन्मान दिला जातो. यंदा वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते पोलिस शिपायांपर्यंत विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर हा मान पटकावला आहे.
पदक विजेते अधिकारी, कर्मचारी
अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कोणकेरी व दीपक महाजन, पोलिस हवालदार आशिष बोटके व संतोष शिंदे, तसेच पोलिस शिपाई यामिनी ठाकरे यांचा समावेश आहे. या सर्वांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि तपास प्रक्रियेत उच्च दर्जाची गुणवत्ता राखणे यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे. या सन्मानामुळे दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सहकाऱ्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्य पोलिस दलाकडून दिले जाणारे डीजी इन्शिग्निया हे अत्यंत प्रतिष्ठेचे सन्मानचिन्ह मानले जाते. उत्कृष्ट सेवा, धाडसी कारवाया, गुन्हे तपासातील कौशल्य आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या आधारे या पदकासाठी निवड केली जाते. एकूणच, पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची आणि समर्पणाची राज्यस्तरावर झालेली ही दखल, भविष्यातील कार्यासाठी नवी प्रेरणा देणारी ठरत आहे.
अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली यांची उल्लेखनीय कारकीर्द
अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली यांनी गेल्या 15 वर्षांत पोलिस खात्यात उत्कृष्ट सेवा बजावत ठसा उमटवला आहे. या कालावधीत त्यांनी अनेक क्लिष्ट व संवेदनशील गुन्ह्यांचा तपास अत्यंत संयम, दक्षता आणि कौशल्याने पूर्ण केला. विविध मोर्चे, आंदोलने आणि राज्यभर चर्चेत राहिलेली प्रकरणे त्यांनी शांतपणे व प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. सातत्यपूर्ण, कर्तव्यनिष्ठ आणि गुणवत्तापूर्ण सेवेमुळे त्यांना महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले असून, त्यांच्या कार्याचे पोलिस दलात कौतूक होत आहे.
दिशा देणारे नेतृत्व विशाल हिरे
सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे (2015 बॅच) यांनी चंद्रपूरच्या नक्षलग््रास्त भागात 2016 ते 2019 दरम्यान उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर सोलापूर ग््राामीणमधील करमाळा उपविभागात उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना कोरोना काळात प्रभावी नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखा, दिशा व संवाद उपक्रमांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष बाल पोलिस पथकाच्या माध्यमातून भरकटलेल्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरले आहेत.
सायबर गुन्हेगारांचा कर्दनकाळ प्रवीण स्वामी
सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी 2024 पासून आतापर्यंत सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 268 संशयितांना अटक केली आहे. फसवणुकीतील तब्बल 33 कोटी 88 लाख 99 हजार 64 रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली आहे. तसेच, नोंद असलेल्या 77 गुन्ह्यांपैकी 60 गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरीची दखल घेत त्यांना महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.
पोलिस हवालदार आशिष बोटके यांची दमदार कामगिरी
पोलिस हवालदार आशिष बोटके यांनी संवेदनशील राजू दर्शीले खून प्रकरणाचा तपास कौशल्यपूर्ण पद्धतीने उलगडत महत्त्वपूर्ण धागेदोरे समोर आणले. त्याचबरोबर त्यांनी चैन चोरीचे तब्बल 30 गुन्हे उघडकीस आणत आरोपींना अटक केली. अवैध शस्त्रांविरोधात कारवाई करत 52 अग्निशस्त्रे जप्त केली. तर, वाहन चोरीच्या 100 पेक्षा अधिक गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत 189 बक्षिसे प्राप्त झाली आहेत. सातत्य, धाडस आणि तपासातील बारकावे यामुळे बोटके यांनी पोलिस दलात ठसा उमटवला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.