बजरंग मासाळ
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक परिसरात सध्या एक विरोधाभासी चित्र पहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर तातडीने कर्मचारी हवे आहेत', 'हेल्पर हवे आहेत', 'मशीन ऑपरेटर हवे आहेत', 'वेल्डर हवे आहेत', 'तंत्रज्ञ हवे आहेत'अशा भरतीच्या पाट्या झळकत आहेत. सकाळपासून कंपन्यांच्या गेटबाहेर नोकरीसाठी आलेल्या युवकांच्या रांगा दिसतात. तरीही बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे.
नेमके वास्तव काय आहे, याचा शोध घेण्यासाठी उद्योग, एच.आर. मानवसंसाधन अधिकारी, कामगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांशी संवाद साधला. त्यातून समोर आलेले चित्र केवळ नोकऱ्या नाहीत किंवा कामगार मिळत नाहीत. एवढ्यावर मर्यादित नसून, उद्योगांच्या अपेक्षा आणि युवकांच्या अपेक्षांमधील वाढत्या दरीचे आहे.
उद्योगनगरीत दिसणारे ‘व्हॅकन्सी’चे बोर्ड आणि त्याच गेटबाहेर उभे असलेले नोकरीच्या शोधातील युवक हे दोन वेगवेगळे प्रश्न नसून एकाच व्यवस्थेच्या दोन बाजू आहेत. उद्योगांना फक्त कर्मचारी नकोत, तर प्रशिक्षित, संयमी आणि दीर्घकाळ टिकणारे कर्मचारी हवेत. दुसरीकडे युवकांना केवळ नोकरी नको, तर सन्मानजनक वेतन, सुरक्षित वातावरण आणि भविष्याची हमी हवी असल्याचे चित्र दिसून आले
कामगार टिकवणे उद्योगांसाठी सर्वात मोठे आव्हान
आज कुशल कर्मचारी मिळणे जितके कठीण आहे, त्याहून मोठे आव्हान म्हणजे त्यांना टिकवून ठेवणे. अनेक युवक हेल्पर म्हणून कामाला लागतात. काही दिवसांतच अनुभवी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा पाहून त्यांच्या अपेक्षा वाढतात. मात्र आवश्यक अनुभव किंवा कौशल्य विकसित होण्यापूर्वीच अधिक वेतनाची अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे दुसरीकडे थोडी चांगली ऑफर मिळताच अनेक कर्मचारी नोकरी बदलतात. काही कर्मचारी महिन्याचा पगार खात्यात जमा झाल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर येणे बंद करतात. नियमानुसार राजीनामाही देत नाहीत. त्यामुळे उत्पादन नियोजन कोलमडते आणि नवीन कर्मचारी भरती करून त्याला पुन्हा प्रशिक्षण देण्याचा अतिरिक्त खर्च कंपन्यांवर पडतो.
सात दिवसांचे प्रशिक्षण अन् लगेचच राजीनामा
प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला कंपनीत किमान सात दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. मशीनची माहिती, सुरक्षा नियम, गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन प्रक्रिया समजावून सांगितली जाते. मात्र, काही कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण होताच नोकरी सोडतात. त्यामुळे प्रशिक्षणावरील वेळ, मनुष्यबळ आणि आर्थिक गुंतवणूक वाया जाते.
शेकडो मुलाखती… निवड फक्त ४० ते ५० जणांची
एका रिक्त पदासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार येतात. मात्र, आवश्यक कौशल्य, मशीन हाताळण्याचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि कामाची शिस्त या निकषांवर अनेक उमेदवार अपुरे पडतात. त्यामुळे शेकडो उमेदवारांपैकी केवळ ४० ते ५० जणांचीच निवड होते. निवड झाल्यानंतरही अनेक कर्मचारी काही महिन्यांतच नोकरी सोडतात.
'पगार कमी' की 'अनुभव कमी'?
कामगारांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. महागाईच्या काळात सुरुवातीचा पगार अपुरा असल्याची त्यांची तक्रार आहे. अनेक कंपन्यांमध्ये उत्पादनाचे लक्ष्य, ओव्हरटाईम, शिफ्ट पद्धती, कामाचा ताण आणि कंत्राटी नोकरीमुळे स्थैर्य मिळत नसल्याने कर्मचारी दुसरीकडे संधी शोधतात.
मुलाखतीत प्रामाणिकपणाचाही अभाव
एचआर विभागाच्या मते, काही उमेदवार मुलाखतीत स्वतःचा अनुभव किंवा कौशल्य अतिशयोक्तीने सांगतात. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वास्तव समोर येते आणि त्याचा परिणाम कामगिरीवर होतो. त्यामुळे भरती प्रक्रियेतही उद्योग अधिक सावध झाले आहेत.
एनएपीएस योजनेचा उद्योगांना आधार
आयटीआयच्या विविध ट्रेडमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) अंतर्गत १२ ते २४ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव मिळतो. त्यामुळे भविष्यात कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी वाढतात आणि उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते.
उद्योगांना काय अपेक्षित :
कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी नोकरीत सातत्य व संयम
नियमानुसार राजीनामा प्रक्रिया
उत्पादनाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी
प्रामाणिकपणा अन् शिस्त
युवकांच्या प्रमुख अपेक्षा
महागाईनुसार समाधानकारक वेतन
कामाच्या वेळेचे नियोजन
अनावश्यक ओव्हरटाईम टाळावा
नोकरीत स्थैर्य
करिअरमध्ये प्रगतीची संधी
सन्मानपूर्वक वागणूक
ही दरी भरून कशी निघणार ?
उद्योगांनी प्रशिक्षण आणि वेतनवाढीचा स्पष्ट रोडमॅप द्यावा.
युवकांनी एका नोकरीत अनुभव मिळवण्यासाठी संयम ठेवावा.
आयटीआय, कौशल्य विकास संस्था आणि उद्योग यांच्यात अधिक समन्वय व्हावा.
NAPS आणि अप्रेंटिसशिप योजनांचा अधिकाधिक वापर व्हावा.
आज उद्योगांना कर्मचारी मिळत नाहीत, असे नाही; पण कुशल आणि दीर्घकाळ टिकणारे कर्मचारी मिळणे हेच मोठे आव्हान आहे. नव्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणासाठी वेळ आणि पैसा खर्च केल्यानंतर काही जण कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरी सोडतात. त्यामुळे उद्योगांचे उत्पादन नियोजन विस्कळीत होते. दुसरीकडे, उद्योगांनीही कर्मचाऱ्यांना कौशल्यवृद्धी, करिअरची संधी आणि योग्य वेतनाचा स्पष्ट मार्ग दिला, तर कर्मचारी टिकवून ठेवणे अधिक सोपे होईल.पवन राचमाळे मानव संसाधन विभाग चाकण
काम करण्याची तयारी आहे; पण महागाईच्या काळात मिळणारा सुरुवातीचा पगार अनेकदा अपुरा पडतो. त्यातच १०-१२ तासांच्या शिफ्ट, कामाचा ताण आणि नोकरीतील अनिश्चितता आम्हाला फक्त नोकरी नाही, तर कौशल्याला न्याय देणारे वेतन हवे आहे.संभाजी सोनटक्के