Housing Societies Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Housing Society Issues: पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायटीधारक त्रस्त; मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर

पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, वीज व वाहतूक अडचणींमुळे नागरिक नाराज; प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे गृहनिर्माण संस्थांपुढील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. चिखली, मोशी, चऱ्होली, वाकड आणि पिंपळे सौदागर या भागांतील सोसायटीधारकांना मूलभूत सुविधांपासून प्रशासकीय प्रक्रियांपर्यंत विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा कर भरूनही नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे.

कचरा व्यवस्थापनाचा वाढता बोजा

पालिकेकडून युजर फी आकारली जात असतानाही कचरा व्यवस्थापनाचा अतिरिक्त भार सोसायटीधारकांवर टाकण्यात येत आहे. कचरा वर्गीकरण व व्यवस्थापनाचा सोसायटीवर दुहेरी आर्थिक बोजा पडत आहे. स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची मागणी केली जात आहे. कर भरल्यानंतरही सेवा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

डिम्ड कन्व्हेअन्स आणि मालमत्ता हक्कातील अडथळे

गृहनिर्माण संस्थांसाठी सर्वांत गुंतागुंतीचा विषय म्हणजे (डिम्ड कन्व्हेअन्स) प्रक्रिया. अनेक बिल्डर अभिहस्तांतरणासाठी पुढे येत नसल्याने सोसायट्यांना कायदेशीर मार्ग स्वीकारावा लागत आहे. तसेच, प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी सिटी सर्व्हे कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे.

नागरिकांचा वाढता संताप

या सर्व समस्यांमुळे सोसायटीधारक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.मूलभूत सुविधा अपुऱ्या असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रश्नांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

उपाययोजनांची गरज

  • नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे. तसेच, वीजपुरवठा स्थिर करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे. वाहतूक व्यवस्थापन सुधारून अतिक्रमणांवर कारवाई, कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेची जबाबदारी निश्चित करणे, डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करणे.

  • शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्तारासोबत मूलभूत सुविधांचा समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या अडचणी अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाणीपुरवठा अपुरा, टँकरवर अवलंबित्व

महापालिकेकडून दिवसाआड होणारा अपुरा पाणीपुरवठा हा सर्वांत मोठा प्रश्न ठरत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

टँकर व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात

नागरिकांच्या अडचणींचा गैरफायदा टँकर व्यावसायिकांकडून घेतला जाता आहे. तसेच, पाण्याच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित होते. विकतच्या पाण्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचा मासिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. टँकर व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे. वाकड आणि हिंजवडीसारख्या आयटी पार्क परिसरातदेखील वीजपुरवठ्याचा खोळंबा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. वारंवार वीज खंडित होणे. बॅकअप सिस्टमवर अतिरिक्त खर्च होतो. तसेच, घरून काम करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

वाकड, हिंजवडी, पिंपळे सौदागर परिसरात वाहतूककोंडी गंभीर प्रश्न

अर्बन स्ट्रीट प्लान अंतर्गत पदपथ व सायकल ट्रॅक तयार करण्यात आले असले तरी त्याचा अपेक्षित फायदा झालेला नाही. रस्ते अरुंद झाल्याने वाहनांची कोंडी, पदपथ व सायकल ट्रॅकवर बेकायदा हॉकर्स, आठवडे बाजारामुळे वाढलेली गर्दी, रस्त्याच्याकडेला अनधिकृत पार्किंग, परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT