पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयास माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच, थेरगाव येथील नियोजित कॅन्सर (कर्करोग) रुग्णालयास दिवगंत आमदार लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभेत मान्यता दिली. तसेच, रुग्णालय, विरुंगळा केंद्र, उद्यान, भाजी मंडई, सभागृह, चौक, रस्ते, पुल आदींचे नामकरण करण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला आहे.
महापालिकेच्या मंगळवारी (दि.5) झालेल्या तहकूब सभेत नामकरणाच्या अनेक उपसूचनांना सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिली. नवीन भोसरी रुग्णालयास माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. थेरगाव येथील नियोजित कॅन्सर रुग्णालयास दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव देण्यात येणार आहे.
पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ (डॉयनासोर पार्क) उद्यानातील तसेच, बट्टूराव जगताप उद्यानातील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रास तसेच, येथील बस स्थानकास लोकनेते लक्ष्मण जगताप असे नाव देण्यात येणार आहे.
बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील ॲमेनिटी स्पेसला डॉ. केशव हेडगेवार उद्यान असे नाव देण्यात येणार आहे. बोऱ्हाडेवाडीतील स्प्रिंग गार्डन ते मंत्रा मुमेंट सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यास वासुदेव जाधव मार्ग असे नाव देण्यात येणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील बोऱ्हाडेवाडीपासून रंजन काटापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास डॉ. सुभाषचंद्र भोस यांचे नावे दिले जाणार आहे. बोऱ्हाडेवाडीतील सीएनजी पंपापासून लक्ष्मी चौकाच्या शिवरोडला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. चऱ्होली येथे होणाऱ्या भाजी मंडईस सरपंच मल्हारराव दाभाडे सरकार असे नाव देण्यात येणार आहे.
भोसरी ते आळंदी रस्त्याचे वारकरी भक्ती मार्ग नामकरण
चिखलीमधील जुना मोई फाटा येथील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देणे, जाधववाडीतील सभागृहात रामायण मैदान सभागृह, उद्यानाला तळई गार्डन, मुख्य चौकाला सावता महाराज, वाड्यातील चौकाला सुभाष जाधव आणि शिवरोड ते मधला पेठेकडे जाणाऱ्या मुख्य चौकास जाधव कॉर्नर, शिवरोडवरील महाराज चौकास निवृत्ती जाधव मार्ग, वडाचा मळा चौकास वडाचा मळा, सिटी प्राईडजवळील चौकाला छत्रपती संभाजी महाराज आणि रिव्हर रेसिडन्सी सोसायटीजवळील चौकास श्रीराम चौक असे नाव देण्यात येणार आहे. भोसरी ते आळंदी रस्त्यास वारकरी भक्ती मार्ग असे नाव देण्यात आले आहे. भोसरी उड्डाणपुलाखालील दिघी रस्त्याजवळच्या चौकास भारतीय संविधान चौक तर, दुसऱ्या चौकास छावा चौक असे नाव देण्यात आले आहे.
यमुनानगर, निगडी येथील सद्गुरू उद्यानातील विरुंगळा केंद्रास सद्गुरू असे नाव देण्यात आले आहे. स्पाईन रस्ता येथील चिकन चौकास जय लहूजी असे नाव देण्यात आले आहे. स्पाईन रस्तालगत त्रिवेणीनगर चौकाच्या अलिकडील दुभाजक चौकास तिरंगा चौक असे नाव देण्यात आले आहे, या उपसूचनांना मान्यता देण्यात आली आहे.
तळवडेतील बायोडायव्हर्सिटी पार्कला अजितदादांचे नाव
महापालिकेच्या वतीने तळवडे येथे बायोडाटव्हर्सिटी पार्क प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या प्रकल्पासाठी तत्कालिन मुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत मोफत जागा उपलब्ध करून दिली होती.
त्या पार्कला अजितदादा पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक 278 येथील 18 मीटर डीपी रस्त्यास माधवराव गावडे यांचे नाव देण्यात येणार आहे. चिंचवड गाव येथील पवना नदीवरील धनेश्वर मंदिराशेजारील बटरफ्लाय पुलास महासाधू मोरया गोसावी महाराज सेतू असे नाव देण्यात आले आहे, या उपसूचना सभागृहात स्वीकारण्यात आल्या आहेत.
दापोडी ते निगडी महामार्गास अण्णासाहेब मगर हमरस्ता नाव
शहरातील दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर अंतराच्या जुन्या महामार्गास तसेच, प्रशस्त ग्रेडसेपरेटर मार्गास अण्णासाहेब मगर हमरस्ता असे नाव देण्यात येणार आहे. निगडी येथील उड्डाण पुलास दिवंगत महापौर मधुकरराव पवळे असे नाव विस्तार करण्यात येणार आहे. पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डनला शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन असे नाव देण्यात आले आहे. या नामकरणाच्या उपसूचनांना मान्यता देण्यात आली आहे.