Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Highway Accidents: पिंपरी-चिंचवडमधील चार महामार्ग ठरताहेत मृत्यूचे सापळे; अडीच वर्षांत 355 जणांचा बळी

मुंबई-बंगळुरू, पुणे-मुंबई, पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले; वेग आणि अवजड वाहनांची वर्दळ ठरतेय कारण

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारे मुंबई-बंगळुरू महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग आता अपघातांचे 'हॉटस्पॉट' बनत आहेत. मागील अडीच वर्षांत या चार महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये तब्बल ३५५ जणांचा मृत्यू, तर ४९२ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाढती वाहनसंख्या, अवाजवी वेग, औद्योगिक पट्ट्यामुळे वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हे महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणाऱ्या या चारही महामार्गांवर दररोज लाखो वाहनांची ये-जा होते. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच चाकण, तळेगाव, भोसरी आणि हिंजवडीसारख्या औद्योगिक भागांकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनांची संख्या मोठी आहे. याशिवाय आयटी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारीही या महामार्गांचा रोज वापर करतात. त्यामुळे दिवसाच्या बहुतांश वेळेत या मार्गांवर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. या गर्दीत वेगमर्यादेचे उल्लंघन, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, अचानक लेन बदलणे, निष्काळजीपणे ओव्हरटेक करणे आणि थकलेल्या अवस्थेत वाहन चालविणे यामुळे गंभीर अपघात घडत आहेत.

आकडे बोलतात...

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार, सन २०२४ मध्ये या चार महामार्गांवर १४२ जणांचा मृत्यू झाला असून, १६४ जण गंभीर जखमी झाले. सन २०२५ मध्ये मृतांचा आकडा आणखी वाढून १४७ वर पोहोचला, तर २०९ जण गंभीर जखमी झाले. यंदा जूनअखेरच या चार महामार्गांवर ६६ जणांनी प्राण गमावले असून, ११९ जण गंभीर जखमी झाले आहेत. म्हणजेच केवळ अडीच वर्षांत ३५५ जणांना जीव गमवावा लागला, तर जवळपास पाचशे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

शिफ्ट बदलण्याच्या वेळेत अपघात

अपघातांमध्ये दुचाकीस्वार, कारचालक, मालवाहू वाहनचालक तसेच पादचारीही बळी पडत आहेत. विशेषतः औद्योगिक भागांमध्ये शिफ्ट बदलण्याच्या वेळेत वर्दळ वाढत असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी, निसरडा रस्ता आणि कमी दृश्यमानताही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे.

अपघातांची प्रमुख कारणे

औद्योगिक क्षेत्रामुळे अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. अनेक ठिकाणी वाहनचालक लेन शिस्त पाळत नाहीत. अतिवेग, अचानक लेन बदलणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आणि दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर टाळणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. रात्रीच्या वेळी थकलेल्या अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांमुळेही गंभीर अपघात घडत असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

द्रुतगती मार्गावर पाच जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर यंदा जूनअखेर झालेल्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सन २०२५ च्या याच कालावधीत हा आकडा सहा इतका होता.

तातडीने उपाययोजना करण्याची गरज

महामार्गांवर ब्लॅक स्पॉटचे तातडीने निर्मूलन, प्रभावी प्रकाशयोजना, स्पष्ट दिशादर्शक फलक, वेग नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा, नियमित वाहतूक अंमलबजावणी आणि जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनीही नियमांचे काटेकोर पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक वाहनचालकाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी वेगमर्यादेची अंमलबजावणी, मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई, ब्लॅक स्पॉटचे परीक्षण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. मात्र, अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित वाहनचालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT