Heavy Vehicle Traffic Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Heavy Vehicle Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये जड वाहनांचा बिनधास्त वावर; वाहतूक निर्बंध कागदावरच?

शाळा भरण्या-सुटण्याच्या वेळेतही लॉरी, क्रेन, मिक्सर रस्त्यांवर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी जड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, हे निर्बंध केवळ कागदावरच असल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवर दिसत आहे. भर दिवसा, शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या गर्दीच्या वेळेतही लॉरी, क्रेन, काँक्रीट मिक्सर आणि अन्य अवजड वाहने शहरातील प्रमुख रस्त्यांवरून बिनधास्त धावत आहेत. वाहतूक विभागाकडून जड वाहनांवर कारवाई केली जात असल्याचे वारंवार सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष रस्त्यावरील परिस्थिती पाहता या दाव्यांची अंमलबजावणी कुठे होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही जड वाहनांच्या बेकायदा वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र दुर्घटना होऊनही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा धाक नेमका कोणाला आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी, शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असताना अशा अवजड वाहनांना प्रवेश कसा मिळतो? वेळेचे निर्बंध असताना भरदिवसा ही वाहने शहरात येतातच कशी? त्यांना अडविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, बांधकाम प्रकल्प, औद्योगिक क्षेत्र आणि विविध विकासकामांमुळे अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, विकासकामांच्या नावाखाली वाहतूक नियमांना हरताळ फासला जात असेल, तर त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना का सहन करावा, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः शाळा परिसर, मुख्य चौक, अरुंद रस्ते आणि वर्दळीच्या मार्गांवरून मोठ्या आकाराची वाहने जाताना वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.

कारवाईच्या घोषणा; प्रत्यक्षात मात्र वाहनांचा धुमाकूळ!

वाहतूक विभागाकडून वेळोवेळी जड वाहनांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात भरदिवसा अवजड वाहने शहरात फिरताना दिसत असल्याने कारवाईचा प्रभाव जाणवत नाही. एखादी मोहीम राबवून काही वाहनांवर कारवाई करण्यापेक्षा नियमित तपासणी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ कारवाईच्या घोषणा करून हा प्रश्न सुटणार नाही. जड वाहनांना शहरात प्रवेश देणाऱ्या मार्गांवर नियंत्रण, वेळेचे काटेकोर पालन आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली, तरच या समस्येला आळा बसू शकतो.

शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सकाळी शाळा भरण्याच्या आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत रस्त्यांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी मोठ्या आकाराच्या लॉरी, क्रेन आणि मिक्सरमधून होणारी वाहतूक धोकादायक ठरू शकते. अवजड वाहनांच्या चालकांना आजूबाजूच्या लहान वाहनांचा आणि पादचाऱ्यांचा अंदाज घेणेही अनेकदा कठीण जाते. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांनी वारंवार हा प्रश्न मांडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नाराजी वाढत आहे. वाहतूक विभागाने केवळ दंडात्मक कारवाईचे आकडे जाहीर न करता प्रत्यक्ष रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी काय उपाय केले, याची माहितीही नागरिकांसमोर मांडण्याची गरज आहे.

उपाययोजना

  • शहरातील प्रवेश मार्गांवर विशेष तपासणी पथके तैनात करावीत.

  • निर्धारित वेळेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.

  • शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत संवेदनशील मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी.

  • नियमभंग करणाऱ्या वाहनांचे सीसीटीव्ही आणि उपलब्ध डिजिटल पुराव्यांच्या आधारे चलन काढावे.

शहरात जड वाहनांवर वाहतूक विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरूच आहे. मात्र, शाळा परिसरात जड वाहनांची वाहतूक होऊ नये, यासाठी आता विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अशा वाहनांवर विशेष नजर ठेवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
डॅा. निलेश देशमुख सहाय्यक पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT