Tree Plantation Pudhari
पिंपरी चिंचवड

Tree Plantation: वड, पिंपळ, चिंच झाडांनी शहर पुन्हा बहरणार महापालिकेचा उद्यान विभाग सरसावरला

यंदाच्या पावसाळ्यात तब्बल पाच लाख देशी झाडांची लागवड

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पूर्वी वड, पिंपळ, चिंच अशी असंख्य डेरेदार झाडे पुणे-मुंबई जुन्या महमार्गाच्या दुतर्फा दृष्टीस पडत होते. तर, नाशिक फाटा ते भोसरीपर्यंतचा पुणे-नाशिक महामार्गावर झाडांच्या गर्दसावलीतून ये-जा करताना एसीतून जात असल्याची भावना निर्माण होत होती.

नदीकाठचा घनदाट परिसर झाडीने बहरला होता. ते चाळीस वर्षांपूर्वीचे हिरवेगार हरित पिंपरी-चिंचवड शहर तयार करण्यासाठी महापालिका सरसावली आहे. वड, पिंपळ, चिंच, आंबा, उंबर, फणस, पेरू, आवळा, जांभूळ अशी तब्बल पाच लाख देशी झाडे यंदाच्या पावसाळ्यात लावली जाणार आहेत. हरित पिंपरी-चिंचवडसाठी उद्यान विभाग सरसावले आहे.

केवळ देशी जातींची ही झाडे लावणार

पिंपरी-चिंचवड शहरात केवळ देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे घनदाट सावलीसह पक्ष्यांना आसरा मिळतो. ती देशी झाडे आपल्या मातीशी पूर्णपणे समरस झालेली असून, स्थानिक पक्षी व प्राण्यांसाठी उत्तम निवारा आणि अन्न पुरवतात. या झाडांना बाहेरील खतांची किंवा जास्त पाण्याची गरज भासत नाही.

वादळी वार्‍यामध्ये ही झाडे सहसा उन्मळून पडत नाहीत. त्यात वड, पिंपळ, कडूलिंब, अर्जून, तामण, पळस तसेच, चिंच, जांभूळ, उंबर, आंबा, फणस, पेरू, आवळा अश्या फळझाडांचा समावेश आहे. तुती, चेरी अशी पक्ष्यांच्या खाद्यासाठी झाडे लावली जाणार आहेत. सुमारे पाच फूट वाढलेले रोप लावले जाणार आहे. ते झाड जगण्याचे प्रमाण अधिक असते.

मोकळ्या जागेत वृक्षारोपण

महापालिकेकडून दरवर्षी सुमारे 2 लाख झाडे लावण्यात येतात. त्यामुळे शहरात अनेक भागांत दाटवनासह हिरवळ तयार झाली आहे. महापालिकेची छोटी आणि मोठी अशी तब्बल 203 सार्वजनिक उद्याने आहेत. त्यात मोठ्या संख्येने देशी झाडे लावण्यात आली आहेत. तसेच, महापालिकेच्या मोकळ्या जागा, पदपथाच्या कडेने, दुभाजकावर, मैदान व सीमाभिंतीच्या कडेने झाडे लावण्यात आली आहेत.

तसेच, देहूरोड, सांगवी, दिघी, दापोडी या संरक्षण विभागाच्या जागेतही झाडे लावण्यात येतात. त्यामुळे शहरात सर्वत्र झाडे व हिरवळ दृष्टीस पडते. त्यामुळे पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील हवा अधिक ताजी व स्वच्छ असल्याचा अनुभव नागरिकांना येतो.

दमदार पाऊस झाल्यानंतर लागवडीस वेगाने सुरुवात

यंदा पावसाळा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात करण्यात आलेली नाही. शहरातील काही भागांत खड्डे घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रावेत जॉगिंग ट्रॅक येथे खड्डे घेण्यात आले आहेत. दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर वृक्षारोपण मोहीम वेगाने राबवण्याचे नियोजन उद्यान विभागाने केले आहे.

शहरातील दाट वने म्हणजे ऑक्सिजन पार्क तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित जागेत व कडेने झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या जागांवर अतिक्रमण होणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 2 लाख झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित 3 लाख झाडांचे नियोजन त्यानंतर केले जाणार आहे. महापालिका केवळ झाडे लावणार नाही तर, त्याचे संवर्धनही करणार आहे. पावसाळ्यात सर्व 5 लाख झाडांची लागवड केली जाणार आहे.
- महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT