Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC General Body Meeting Controversy: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तहकूब सभेत ‘ठरावां’वरून वाद

विषयपत्रिकेबाहेरील मंजुरी अधिकृत नाही; प्रशासनाची स्पष्टोक्ती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब विशेष सभा शुक्रवारी (दि. 20) झाली. त्यात स्थायी समिती आणि विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड हे विषय होते. ते विषय बाजूला सारून सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांनी तब्बल पाच तास आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनावर आगपाखड केली. त्यात काही विषय महापौर रवी लांडगे यांनी मंजुर केल्याचे घोषित केले. मात्र, नियमानुसार ते अधिकृत ठराव नसल्याचे स्पष्ट होत आहे. ती केवळ नगरसेवकांची भावना असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापौर व उपमहापौर तसेच, स्थायी समिती आणि विविध विषय समितीच्या सदस्यांची निवडीसाठी महापालिकेची विषय सभा सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 फेब्रुवारीला झाली. त्या सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी ती सभा शुक्रवार (दि.20) दुपारी एकपर्यंत तहकूब केली.

तहकूब सभेत विषयपत्रिकेनुसार स्थायी समिती आणि विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड करणे अपेक्षित होते. मात्र, महापौर रवी लांडगे यांनी भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सुचनेवरून सभागृहात नवविर्चाचित नगरसेवकांना चर्चा करण्यास सहमती दिली. त्यासाठी केवळ तासभराचा वेळ दिला. मात्र, शहरातील मोकाट कुत्री, पाणीटंचाई, कचर्याचे ढीग, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, पीएमपीएल बसची अपुरी संख्या, खराब ड्रेनेजलाईन, निगडी ते पिंपरी मार्गावर मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था, मालमत्ताकर भरण्यास अभय योजना, डीपीवर सुनावणी, स्मार्ट सिटीची दर्जाहीन कामे तसेच, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सभागृहात तैलचित्र उभारणे, नवीन महापालिका भवनाच्या आवारात अजितसृष्टी उभारणे आदी विषयांवर तब्बल पाच तास चर्चा झाली.

नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या असंख्य तक्रारींवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासाही केला. महापौर लांडगे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सभागृहात तैलचित्र उभारण्यास मंजुरी दिली. तसेच, चिंचवड येथील सायन्स पार्कजवळील नवीन महापालिका भवनाच्या आवारात अजितसृष्टी उभारण्यासही मान्यता दिली. मोकाट कुत्र्यांचे नियंत्रण, अग्निशमन अधिकार्यांची बदली करणे, भामा आसखेड पाणी योजनेसाठी नवीन ठेकेदार नेमण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले.

महापौरांनी मंजुर केलेले प्रस्ताव हे विषयपत्रिकेवर नव्हते. त्यामुळे ते विषय अधिकृतरीत्या मंजुरी झालेले नाहीत. त्याकरीता ते सर्व विषय विषयपत्रिकेवर असणे आवश्यक आहे. तसेच, एखाद्या विषयाला उपसूचना देऊन ते ऐनवेळी अनेक विषयांना मंजुरी दिली जाते. बहुमताच्या जोरावर असे प्रकार सभागृहात नेहमीच होतात. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर त्या विषयाला कधी मंजुरी दिली गेली, हे अनेक नगरसेवकांनाही कळलेले नसते. असे प्रकार सभागृहात अनेकदा घडले आहेत. मात्र, निवडीच्या विषयाला या उपसूचना देता येत नाहीत. त्या नियमाला धरून नाहीत, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सभेत झालेले ठराव हे अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगरसेवकांनी केलेली चर्चाही निष्पळ ठरली का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

ती सभागृहाची भावना

महापालिकेच्या विषयपत्रिकेवर स्थायी समिती व विषय समिती सदस्य निवडीचा विषय होता. त्यानुसार महापालिकेतील नगरसेवक संख्येनुसार समिती सदस्यांची निवड करण्यात आली. इतर विषयांवर जी चर्चा झाली, ती सभागृहाची भावना होती, असे महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

निवडीनंतर अभिनंदनाचा प्रस्ताव करणे नियमाला धरून

स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर सभागृहात नियमानुसार अभिनंदनाचा प्रस्ताव करत आला असता. त्यावर सभागृहात चर्चा करता आली असते. मात्र, सभेत इतर विषय मंजूर करून, ठराव करणे हे नियमाला धरून नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT