पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह झालेले माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांच्या पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात चकारा वाढल्या आहेत. महापालिकेतील विविध विभागांतील अधिकाऱ्यांशी भेट घेऊन प्रभागांतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा केली जात आहे. (Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेच्या चार सदस्यीय 32 प्रभागांची रचना अंतिम झाली आहे. तसेच, प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्याचे कामही सुरू झाले आहे. आरक्षण सोडत काढण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. महापालिकेकडून निवडणूक तयारीस वेग आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या जबाबदाऱ्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते.
महापालिका निवडणुकीमुळे माजी नगरसेवकांसह इच्छुक ॲक्टिव्ह झाले आहेत. महापालिका भवन तसेच, क्षेत्रीय कार्यालयात त्यांच्या चकारा वाढल्या आहेत. आपल्या प्रभागातील काम तसेच, अनेक दिवसांपासून कार्यवाही न झालेली रखडलेली काम पूर्ण करण्यासाठी माजी नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. विशेष करुन आरोग्य, ड्रेनेज, कर संकलन, स्थापत्य या विभागात त्यांचा राबता वाढला आहे. तसेच, निवडणूक विभागात निवडणुकीबाबतची माहिती घेतली जात आहे. आपल्या शंका तसेच, अडचणींबाबत अधिकाऱ्यांकडून उपाय जाणून घेतले जात आहेत.
नवरात्रीनंतर दिवाळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
निवडणुकीमुळे माजी नगरसेवकांसह इच्छुक प्रभागात कामाला लागले आहेत. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गर्दी दिसत आहे. नवरात्रोत्सवात अनेक इच्छुकांनी आपल्या प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. मोठंमोठे फ्लेक्स, कटआऊट, बॅनर लावून त्यांनी आपणच भावी नगरसेवक असे गर्जना करून टाकली आहे. तसेच, दांडीया, गरबा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विशेषत: महिला वर्गावर बक्षीसाची लयलूट करण्यात आली. आता दिवाळीतही त्याच प्रकारे प्रसिद्धी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या निमित्त सांस्कृतिक स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा, किल्ले सहल, देवदर्शन, स्नेहमेळावा आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.