पिंपरी: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवड शहराची दैनंदिन गतीच विस्कळीत केली आहे. इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीकाठच्या परिसरात पाणी वेगाने वाढल्याने अनेक ठिकाणी नदीचे पाणी नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचले. या पार्श्वभूमीवर शहरातील नदीकाठच्या विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून पूरस्थितीचा घेतलेला आढावा.
नदी आज फक्त वाहत नव्हती, तर तिचा प्रवाह परिसराला सतर्क राहण्याचा इशारा देत होता. नदीकाठच्या अनेक भागात पाणी नेहमीच्या पातळीपेक्षा अधिक वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. काही कुटुंबांनी महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली होती. “दरवर्षी पाऊस पडतो, पण यंदा नदी इतक्या वेगाने वाहताना पाहून भीती वाटली,” अशी भावना एका नदीकाठच्या रहिवाशाने व्यक्त केली.
घरात शिरलेले पाणी, घराबाहेर उभे राहिलेले आयुष्य
काही नदीलगतच्या वस्त्यांमध्ये पाणी थेट घरांमध्ये घुसले. अंगण, ओटे, घरातील साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंना फटका बसला. अनेक कुटुंबे पाणी ओसरण्याची वाट पाहत घराबाहेर उभी होती. लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य, घरातील फर्निचर आणि इलेक्ट्रिक उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती.
बंद रस्ते… वाढलेला प्रवास
शहर आणि उपनगरांना जोडणारे काही महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बदलली. काही लहान पूल सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आले. परिणामी नागरिकांना अनेक किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागला. दैनंदिन कामासाठी बाहेर पडणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला.
चौक झाले जलतळे, वाहतूक संथ
अनेक प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी वाहनचालकांनी वाहन बंद पडू नये, म्हणून रस्त्याच्या कडेला थांबणे पसंत केले. पावसाच्या सततच्या सरींमुळे शहराची वाहतूक संपूर्ण दिवस संथ गतीने सुरू होती.
शहराचा आजचा चेहरा
पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांमध्ये पावसाने निसर्गाची ताकद दाखवून दिली. कुठे नदी दुथडी भरून वाहत होती, कुठे रस्ते पाण्याखाली गेले होते, कुठे घरांमध्ये पाणी शिरले होते, तर कुठे दुकानांतील माल भिजत होता. चौकांमध्ये वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गांचा शोध, आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरील चिंता या सर्व चित्रांनी शहरातील पूरस्थितीची तीव्रता स्पष्टपणे अधोरेखित केली.
दुकान उघडले… पण ग्राहकांऐवजी पाणी आले
नदीकाठच्या तसेच सखल भागातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार पूर्णपणे ठप्प झाला. काही व्यापाऱ्यांनी सकाळी दुकान उघडले, मात्र काही मिनिटांतच पाणी आत येऊ लागल्याने शटर बंद करण्याची वेळ आली. “माल वाचवायचा की दुकान? हा प्रश्न पडला होता. पावसामुळे दिवसभर व्यापारच झाला नाही,” अशी प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली.
चारही बाजूंनी पाणी… गावठाणांचा संपर्क तुटला
शहरालगतच्या काही गावठाणांमध्ये चारही बाजूंनी पाणी साचल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले. काही भागांमध्ये रस्त्यांवरून वाहणारे पाणी इतके वाढले की परिसर बेटासारखा दिसत होता. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
प्रतिबंधित क्षेत्रांभोवती सतर्कता
नदीकाठच्या धोकादायक भागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही परिसर प्रतिबंधित करण्यात आले. नागरिकांनीही या सूचनांचे पालन करत नदीकिनाऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेवले. अनेक ठिकाणी लोक पूर पाहण्यासाठी थांबत असले तरी स्थानिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले.
पावसातही सुरू राहिलेली जीवनाशी झुंज
दूधवाले, भाजी विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी, रिक्षाचालक आणि रोजंदारीवर काम करणारे नागरिक पावसाशी संघर्ष करत आपले काम सुरू ठेवताना दिसले. शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी जीवनाची चाकं थांबली नव्हती.
पावसाचा मानसिक परिणाम
पूर म्हणजे केवळ पाणी नाही, तर अनिश्चिततेची भावनादेखील आहे. सतत वाढणारी नदी, घरात शिरणारे पाणी, बंद रस्ते आणि पुढे काय होईल याची चिंता नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अनेकांनी रात्री झोप न लागल्याचे सांगितले. पाण्याची पातळी वाढते की कमी होते, यावरच त्यांचे लक्ष होते.
केशवनगर शाळा चिंचवडगाव येथे आम्हाला स्थलांतरीत करण्यात आले आहे. मुलांना सकाळी रात्रीचे जेवण गरम करून दिले. पालिकेकडून चहा-नाष्टा काही आले नाही. एक वाजेपर्यंत वाट पाहिली. हाताला लागेल तेवढेच सामान सोबत आहे. घर पाण्यात गेले.मनीषा जाधव, रहिवासी
आमचे सामान अन् साहित्य तर घरातच राहिले स्वत:चा जीव वाचवत कसेबसे बाहेर पडलो. पहाटे पाच वाजता आम्हाले शाळेत हलवण्यात आले. आमचा सगळा संसार पाण्यात वाहून चाललाय. प्रशासनाने आमची दखल घ्यावी.कौसल्या ढेंबरे, रहिवासी
सततच्या मुसळधार पावसामुळे व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरले आहे. कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार मालाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी पूरनियंत्रण उपाययोजना कराव्यात.राज राजपूत, उद्योजक