Firecracker Stall Permission Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Firecracker Stall Permission: पिंपरी-चिंचवडमध्ये फटाका स्टॉलसाठी कडक नियम; विनापरवाना विक्री केल्यास कारवाई

अग्निशमन विभागाचा इशारा; आतापर्यंत २३ अर्ज, एकालाच परवानगी, आरसीसी बांधकाम व शटर असलेल्या गाळ्यांनाच मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दिपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, शहरातील विविध भागात फटाका विक्रीसाठी स्टॉल उभारले जावू लागले आहेत. दरवर्षी अनेक स्टॉल परवानगी न घेताच उभारले जातात; परंतु यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कडक धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची परवानगी व अग्निशमन विभागाचा 'ना हरकत' दाखला (एनओसी) घेऊनच स्टॉल उभारावेत अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आतापर्यंत शहरातील विविध भागातून फटाका स्टॉलसाठी 23 जणांनी परवानगीसाठी अग्निशमन विभागाकडे अर्ज केला आहे.

गणेशोत्सव, नवरात्र उत्सव झाल्यानंतर आता, नागरिकांना दिपावली या सर्वात मोठ्या सणाची उत्सुकता लागली आहे. पाच नोव्हेंबरला वसुबारस असून, त्यानंतर दिवाळी सणाला सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, ल आणि ज या दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फटाका स्टॉलबाबत पत्र पाठविले आहे. दरवर्षी दहाही क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी फटाका विक्री उभारण्यात येत असतात; परंतु फटाका स्टॉलची संख्या जास्त असताना मोजकेच दुकानदार अधिकृत परवानगी घेतात. गतवर्षी शहरात मोठ्या संख्येने फटाका स्टॉल असताना फक्त 100 जणांनी महापालिकेची अधिकृत परवानगी घेतली होती. त्यामुळे यंदा अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी फटाका स्टॉलबाबत कडक भूमिका घेतली आहे.

शहरात विनापरवाना फटाका स्टॉलबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. अशा विनापरवाना फटाका स्टॉलमुळे आग लागण्याचा तसेच, जीवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्टॉल उभारण्यासाठी मोकळ्या जागेवर परवानगी दिली जात नाही. आरसीसी बांधकाम व शटर असलेल्या गाळ्यांमध्येच स्टॉलसाठी परवानगी दिली जाते. त्यानुसार व्यावसायिकांनी फटाका स्टॉल उभारण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयासह अग्निशमन विभागाकडून तात्पुरता स्वरूपाची परवानगी घ्यावी. आग लागून एखादी दुर्देवी घटना घडू नये, यासाठी सर्व नियमांचे पालन करावे.

क्षेत्रीय अधिकार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील फटाका विक्री स्टॉलची पाहणी करून, ज्या स्टॉलधारकांनी आवश्यक परवानगी घेतलेली नाही किंवा अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला प्राप्त केलेला नाही, अशा स्टॉलधारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, अशी सूचनाही अग्निशमन विभागाने दिल्या आहेत. स्टॉलधारकांनी आवश्यक परवानग्या प्राप्त केल्याशिवाय फटाका विक्री सुरू करू नये, असे आवाहनही उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे. दरम्यान, फटाका स्टॉलसाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून जागेनुसार दोन हजार ते अडीच हजार रूपये शुल्क आकारून परवानगी देण्यात येते.

स्टॉल उभारताना अशी घ्या काळजी

आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी. फटाका स्टॉल परिसरात, बिडी, सिगारेट पेटवू नये. स्टॉल परिसरात ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. फटाका स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे. एक ते पाच हजार लिटर पाण्याची व्यवस्था ठेवावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

बेकायदा स्टॉलवर कारवाई

महापालिकेच्या दहाही क्षेत्रीय कार्यालयाकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला दिला जातो. आतापर्यंत शहर परिसरातून फटाका स्टॉल उभारण्यासाठी 23 जणांनी अर्ज केले आहेत, त्यापैकी एकाला परवानगी दिली आहे. स्थळ पाहणी केल्यानंतर स्टॉलधारकांना परवानगी दिली जाते. बेकायदा फटाका स्टॉल उभारल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी फटका स्टॉल उभारण्यापूर्वी रितसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT