Pimpri Chinchwad RTO Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Fancy Number: पिंपरी-चिंचवडमध्ये फॅन्सी नंबरची क्रेझ; साडेसात महिन्यांत आरटीओला २९.३९ कोटींचा महसूल

०००१, ११११, ९९९९ क्रमांकांना विशेष पसंती; व्हीआयपी नंबरसाठी वाहनधारकांची लाखोंची तयारी

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिंपरी: गाडी लाखोंची असो, वा सर्वसामान्यांच्या बजेटमधील मात्र, नंबर व्हीआयपीच हवा! आपल्या वाहनाला आकर्षक, लक्षवेधी आणि इतरांपेक्षा वेगळी ओळख देण्यासाठी वाहनधारकांकडून पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी दाखविली जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये फॅन्सी नंबरची ही क्रेझ आता कोट्यवधींच्या महसुलाचे कारण ठरत आहे. गेल्या साडेसात महिन्यांत (१ एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०२६) आकर्षक नोंदणी क्रमांकांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत तब्बल २९ कोटी ३९ लाख ६ हजार ८५४ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

वाहनाचा क्रमांक ही पूर्वी केवळ कायदेशीर ओळख होती; मात्र, आता तो प्रतिष्ठा, आवड आणि वैयक्तिक ओळखीचा भाग बनत आहे. वाहनाच्या मॉडेलइतकेच त्याच्या नंबरलाही महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे. गेल्या साडेसात महिन्यांत जमा झालेला महसूल फॅन्सी नंबरच्या वाढत्या आकर्षणाची साक्ष देत आहे. जन्मतारीख, लग्नाची तारीख, शुभ अंक, व्यवसायाशी संबंधित आकडे किंवा सहज लक्षात राहणारे क्रमांक मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. ०००१, ०००७, ११११, ९९९९ यांसारख्या क्रमांकांना विशेष पसंती दिली जाते. या हौसेपोटी वाहनाच्या किमतीव्यतिरिक्त हजारो ते लाखो रुपये खर्च केले जातात. परिणामी, आरटीओच्या तिजोरीत आकर्षक क्रमांकांच्या शुल्कातून मिळणारा महसूलही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

नवीन मालिकेसाठी अशी असते प्रक्रिया

नवीन नोंदणी मालिका सुरू करताना आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अर्जदाराने विहित प्रक्रियेनुसार अर्ज केल्यानंतर त्याला नेमून दिलेल्या दिवशी आरटीओ कार्यालयात उपस्थित राहून निर्धारित रकमेचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) जमा करता येतो. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्जदार असल्यास नियमानुसार पुढील प्रक्रिया केली जाते. त्यामुळे पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी अर्जदारांना निर्धारित वेळापत्रक आणि कार्यालयीन सूचनांचे पालन करावे लागते.

वाहन नोंदणीतही मोठी उलाढाल

दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांत पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये एकूण २४ हजार ५०३ वाहनांची नोंदणी झाली आहे. वाढते नागरीकरण, औद्योगिक विस्तार आणि वाहनांची वाढती गरज यामुळे वाहन नोंदणीचा ओघ कायम आहे. या वाहनांपैकी काही वाहनधारकांकडून आकर्षक क्रमांकांसाठी अतिरिक्त शुल्क भरले जात आहे. मात्र, एकूण वाहन नोंदणी आणि आकर्षक क्रमांक घेतलेल्या वाहनांची संख्या हे स्वतंत्र आकडे आहेत. त्यामुळे फॅन्सी नंबर घेणाऱ्या वाहनांचे नेमके प्रमाण समजण्यासाठी स्वतंत्र आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे.

वेगळ्या मालिकेतील नंबरसाठी तीनपट शुल्क!

चालू असलेल्या नोंदणी मालिकेपेक्षा वेगळ्या मालिकेतील वाहनासाठी एखाद्या व्यक्तीला विशिष्ट क्रमांक आरक्षित करायचा असल्यास त्यासाठी लागू असलेल्या निर्धारित शुल्काच्या तीनपट रक्कम भरावी लागते. म्हणजेच, केवळ पसंतीचा क्रमांक निवडण्याची इच्छा असून चालत नाही; त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भारही सहन करावा लागतो.

ऑनलाइन सुविधा; कार्यालयात जाण्याची गरज नाही

वाहनांची नवीन नोंदणी मालिका सुरू झाली की, वाहनमालकांना आकर्षक क्रमांक घेण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येक वेळी आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करून पसंतीचा क्रमांक आरक्षित करता येतो. यामुळे वाहनधारकांचा वेळ वाचतो; तसेच क्रमांक आरक्षित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते.

१८० दिवसांत नोंदणी बंधनकारक

आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित केल्यानंतर तो १८० दिवसांपर्यंत वैध राहतो. या कालावधीत संबंधित क्रमांकावर वाहनाची नोंदणी करून तो वाहनावर लावणे आवश्यक असते. निर्धारित १८० दिवसांत वाहनाची नोंदणी न झाल्यास आरक्षित क्रमांक आपोआप रद्द होतो. त्यामुळे केवळ नंबर आरक्षित करून दीर्घकाळ तो स्वतःकडे ठेवता येत नाही. वाहन खरेदी आणि नोंदणीचे नियोजन करूनच क्रमांक आरक्षित करणे आवश्यक ठरते.

रक्ताच्या नात्यातच हस्तांतरणाची मुभा

आकर्षक नोंदणी क्रमांक घेतल्यानंतर तो कोणालाही मनमानी पद्धतीने हस्तांतरित करता येत नाही. आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती तसेच पत्नी यांच्या नावेच नियमानुसार हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये आई, वडील, मुलगा, मुलगी आणि पत्नी यांचा समावेश होतो. या नात्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या नावे आकर्षक क्रमांक हस्तांतरित करण्याची तरतूद नाही.

सध्या वाहनधारकांमध्ये व्हीआयपी आणि आकर्षक नोंदणी क्रमांक घेण्याची क्रेझ आहे. अनेक जण आपल्या आवडीचा, जन्मतारखेशी संबंधित किंवा विशिष्ट आकड्यांचा क्रमांक मिळावा यासाठी आग्रही असतात. आपल्या वाहनाला वेगळी ओळख मिळावी, यासाठी निर्धारित शुल्क भरण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे आकर्षक क्रमांकांना मागणी असून, त्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.
राहुल जाधव प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT