Job Scam Pudhari
पिंपरी चिंचवड

Fake Government Job Scam: सरकारी नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची लूट

फसवणूक करणारे सोशल मीडिया किंवा जॉब पोर्टलवरून उमेदवारांची माहिती मिळवतात. त्यानंतर स्वतःला एचआर अधिकारी, भरती सल्लागार, सरकारी विभागातील कर्मचारी किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळख करून देतात.

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुण-तरुणींना गंडा घालणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. प्रभावशाली व्यक्तींच्या ओळखीचा दावा, बनावट नियुक्तीपत्रे, सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उमेदवारांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित संस्थेकडून खातरजमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फसवणूक करणारे सोशल मीडिया किंवा जॉब पोर्टलवरून उमेदवारांची माहिती मिळवतात. त्यानंतर स्वतःला एचआर अधिकारी, भरती सल्लागार, सरकारी विभागातील कर्मचारी किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळख करून देतात.

तुमचा बायोडाटा निवडला आहे, मुलाखतीशिवाय नियुक्ती होईल, मर्यादित जागा आहेत, तातडीने प्रक्रिया पूर्ण करा, अशा आमिषपूर्ण संदेशांद्वारे उमेदवारांचा विश्वास संपादन केला जातो.

पैसे मिळताच आरोपी फरार

यानंतर नोंदणी शुल्क, फाइल चार्ज, मेडिकल फी, प्रशिक्षण शुल्क, सिक्युरिटी डिपॉझिट, व्हेरिफिकेशन फी, आयडी कार्ड शुल्क किंवा पहिल्या पगारानंतर परत मिळणाऱ्या रकमेच्या नावाखाली पैसे मागितले जातात.

विश्वास बसावा म्हणून बनावट ऑफर लेटर, नियुक्तीपत्र, ओळखपत्र आणि ई-मेलही पाठवले जातात. काही प्रकरणांत बनावट लिंक पाठवून बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते. पैसे मिळताच आरोपी संपर्क तोडून फरार होतात.

प्रत्यक्ष भेटून गंडा

काही प्रकरणात आरोपी उमेदवारांना प्रत्यक्ष भेटल्याचे समोर आले आहे. हॉटेल, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांना प्रत्यक्ष भेटले जाते. मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा दावा करत बनावट कागदपत्रे दाखवून व्यवहार केला जातो. त्यामुळे फसवणूक अधिक विश्वासार्ह वाटते आणि अनेक जण त्याला बळी पडतात.

पैसे गेले... नोकरीही मिळाली नाही

फसवणुकीला बळी पडलेल्या एका युवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर आली. कंपनीचे नाव, ई-मेल आणि कागदपत्रे सर्व काही खरे वाटत होते. प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर पुन्हा पैसे मागितले. संशय आल्यावर चौकशी केली असता संपूर्ण भरतीच बनावट असल्याचे समोर आले.

महापालिकेच्या नावाचाही गैरवापर

यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणुकीची प्रकरणे समोर आली होती. प्रभावशाली व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे सांगून उमेदवारांकडून लाखो रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे कोणत्याही सरकारी संस्थेतील भरतीसाठी केवळ अधिकृत प्रक्रियेवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी सहा मंत्र

  • नोकरीसाठी आगाऊ पैसे मागितल्यास सावध राहा

  • अधिकृत संकेतस्थळ, ई-मेलवरच विश्वास ठेवा

  • कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिची खातरजमा करा

  • ओटीपी, बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका

  • मुलाखत किंवा नियुक्तीपूर्वी कोणतेही शुल्क भरू नका

  • संशयास्पद प्रकार आढळल्यास पोलिसांकडे तक्रार करा

नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागितले जात असतील तर, धोक्याचा इशारा समजावा. कोणत्याही व्यक्तीच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नये. संबंधित संस्थेच्या अधिकृत माध्यमातून माहितीची खातरजमा करावी. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी.
- रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT