पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून पती व पत्नी, नातेगोते, एकाच कुटुंबातील सदस्य उतरले आहेत. एका प्रभागात अपक्ष म्हणून पती व पत्नी हे दोघेही उमेदवार रिंगणात आहेत. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्य करत असल्याने मतदारांशी दांडगा संपर्क असून, भरघोस मते मिळतील, असा दांडगा विश्वास त्या जोडप्यास आहे.
दोघे जण रिंगणात असल्याने मतांची विभागणी होईल, म्हणून त्यांच्यात दररोज वाद होत आहे. एकाने माघार घेतल्यास अधिक मते मिळतील, असा त्या दोघांचा दावा आहे. माघार कोणी घ्यावी, यावरुन दोघांमध्ये टोकाचे वाद सुरू आहेत. कुटुंबातील ज्येष्ठांपर्यंत हा वाद पोहचला आहे. त्यांनीही दोघांच्या भानगडीत पडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
माघार घेण्यास कोणीच तयार नसल्याने प्रचार कसा करायचा यावरून त्यांचे एक मत होताना दिसत नाही. त्यावरून वाद आखणी चिघळला आहे. अखेर, घटस्फोटापर्यंत प्रकरण जाऊन पोहचले आहे.
निवडणूक आणि उमेदवारी माघारीचे हे नाट्य प्रत्यक्षात कोणत्या वळणार पोहणार, कोणाला किती मते मिळतात, यावर प्रभागातील नागरिकांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांमधील वादाचा मतदारांना फायदा होत आहे.
त्या दोन्ही उमेदवारांकडून प्रचारासाठी तसेच, मतदारांना खुश करण्यासाठी खर्चाचा सपाटा सुरू आहे. प्रचाराच्या 14 तारखेपर्यंत घ्या मजा करून, असा त्या काही नागरिकांचा कल दिसत आहे.