Theft Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Theft: दिवाळीच्या सुटीत चोरट्यांचा धुमाकूळ; पिंपरी-चिंचवडमध्ये १९ दिवसांत ९७ चोऱ्या

कामगार कुटुंबे गावी गेल्याने बंद घरांना लक्ष्य; पिंपळे गुरवमध्ये एटीएम मशीन कापून २० लाखांची रोकड लंपास

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी कामगार कुटुंबे गावी गेली अन् इकडे चोरट्यांनी बंद घरांवर डल्ला मारला. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या सुटीचा चोरट्यांनी चांगलाच फायदा उठविला. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार शहरात विशेष गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, पोलिसांची नजर चुकवून चोरट्यांनी अनेक ठिकाणी हात साफ केला. १ नोव्हेंबरपासून अवघ्या १९ दिवसांत शहरात चोरीचे तब्बल ९७ गुन्हे दाखल झाले आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोजगाराच्या शोधात आलेल्या कामगारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आपले बस्तान बसविले आहे. शहरातील मोठ्या कंपन्या, औद्योगिक वसाहती, लघुउद्योग आणि विविध व्यवसायांमध्ये हा कामगारवर्ग कार्यरत आहे. वर्षभर कामाच्या व्यापात असलेली ही कुटुंबे दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मूळ गावी जातात. यंदाही दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक शहराबाहेर पडले होते. परिणामी, कामगार वस्त्या, चाळी आणि सोसायट्यांमधील अनेक घरांना कुलूप लागले होते.

चोऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता

पोलिस दप्तरी नोंद झालेल्या ९७ गुन्ह्यांव्यतिरिक्त आणखी काही चोरीच्या घटना घडल्या असण्याची शक्यता आहे. काही कामगार कुटुंबे अद्याप मूळ गावी असल्याने त्यांच्या घरांची स्थिती स्पष्ट झालेली नाही. संबंधित नागरिक परतल्यानंतरच अशा घटनांची माहिती समोर येणार आहे.

दिवसाला सरासरी पाच चोरीचे गुन्हे

शहरात १ ते १९ नोव्हेंबर या अवघ्या १९ दिवसांत चोरीचे ९७ गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज सरासरी पाचपेक्षा अधिक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली. या आकडेवारीवरून सणासुदीच्या काळात चोरट्यांनी किती मोठ्या प्रमाणावर हात साफ केला, याची कल्पना येते.

कष्टाच्या कमाईतून जमविलेली रोख रक्कम गायब

दिवाळीची सुटी संपल्यानंतर नागरिकांचे शहरात परतणे सुरू झाले. त्या वेळी काहींना घरांचे कुलूप तुटलेले, कपाटे उघडलेली आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. सणाचा आनंद घेऊन परतलेल्या या कुटुंबांना घरात चोरी झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. कष्टाच्या कमाईतून जमविलेली रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याने संबंधितांना आर्थिक फटका बसला. गावी गेलेले नागरिक परतू लागल्याने पोलिस ठाण्यांमध्ये चोरीच्या तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

चोऱ्या रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

दिवाळीच्याकाळात संभाव्य घरफोड्या रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष बंदोबस्त आणि गस्तीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या उपाययोजनांनंतरही चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, निवासी भागांतील अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि दीर्घकाळ बंद राहणारी घरे यामुळे चोरट्यांना संधी मिळाल्याचे चित्र होते. त्यातच राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात शहरातील गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

एटीएम केंद्रेही चोरट्यांच्या रडारवर

दिवाळीच्या काळात बंद घरांपाठोपाठ चोरट्यांनी एटीएम केंद्रांनाही लक्ष्य केले. पिंपळे गुरव येथील एटीएम मशीन कापून चोरट्यांनी तब्बल २० लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच, वाकड आणि देहूरोड परिसरातही एटीएम मशीन फोडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या दोन्ही ठिकाणी चोरट्यांचे प्रयत्न फसले. एकाच काळात एटीएम केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याने बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात विशेष गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, तरीही काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे. नागरिकांनी बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच, परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
संदीप आटोळे, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT