Child Safety Awareness Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Child Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये बालगुन्ह्यांचे धक्कादायक वास्तव; आरोपी ओळखीचेच

अपहरण, अत्याचार, हत्या प्रकरणांत नातेवाईक-शेजाऱ्यांचा सहभाग; बालसुरक्षेची गरज अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: नसरापूर येथील चिमुरडीच्या हत्याकांडानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर ‌‘पुढारी‌’ने पिंपरी-चिंचवड शहरातील तत्सम घटनांचा आढावा घेतला असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील वर्षात घडलेल्या चिमुरड्यांवरील अत्याचार, अपहरण आणि हत्यांच्या अनेक प्रकरणांत आरोपी हे ओळखीचे, शेजारी किंवा नातेवाईकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बालकांसाठी धोका हा केवळ बाहेरील नव्हे, तर परिचित वर्तुळातूनच निर्माण होत असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे.

वाकड परिसरात घराजवळ सायकल खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला. तपासात आरोपी परिसरात परिचित असल्याने मुलाने त्याच्यावर विश्वास ठेवला, अशी माहिती समोर आली.

पिंपरीतील सात वर्षीय धनश्री पुणेकर हिच्या अपहरण व हत्येच्या प्रकरणातही संशयाची सुई शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे वळली. घराबाहेर खेळत असताना तिला फूस लावून नेण्यात आले. चार दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चिखली येथील आठ वर्षीय लक्ष्मण देवासी याच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात आरोपीने खंडणीच्या उद्देशाने मुलाला नेले. मात्र, मुलगा रडू लागल्याने भीतीपोटी त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपी हा परिसरातीलच असल्याने मुलाने विरोध केला नाही, असे पोलिसांचे निरीक्षण आहे.

नातेसंबंधांतील विश्वासघात

  • भोसरी परिसरात घडलेल्या घटनेत वडिलांकडूनच मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर आईने दोन मुली व एका मुलाचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आत्महत्या केली. या घटनेत 28 वर्षीय आईसह तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाला.

  • सांगवी परिसरात अडीच वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात आरोपी सख्खा चुलताच निघाला. या घटनेने नातेसंबंधांवरील विश्वास हादरवला.

  • देहूरोड परिसरात सावत्र बापाने तीन वर्षांच्या मुलीला मारहाण करून ठार मारल्याची घटना देखील घरच्यांकडून होणाऱ्या अत्याचाराचे गंभीर स्वरूप दाखवणारी ठरली.

  • उर्से येथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपीने कबुली दिल्यानंतर पोलिसही चक्रावले होते.

आमिष, फसवणूक अन्‌‍ गुन्हेगारी प्रवृत्ती

  • दापोडी येथे चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर वृद्धाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीला आरोपी परिचित असल्याने ती त्याच्यासोबत गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

  • हिंजवडी परिसरात मंदिरात गेलेल्या अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून झाडीत नेऊन अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणात एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार करणारा आरोपी देखील परिसरातीलच असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपींकडून गैरफायदा

शहरातील विविध घटनांचा अभ्यास करता, बहुतांश प्रकरणांत आरोपी हे पीडित बालकांच्या ओळखीतील असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुलांनी कोणताही संशय न बाळगता त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा त्यांच्या सोबत जाणे पसंत केले. याचाच गैरफायदा घेत आरोपींकडून गंभीर गुन्हे घडविण्यात आले.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज

पोलीस यंत्रणा सक्रिय; प्रतिबंधक उपायांची गरज शहर पोलिसांनी या सर्व प्रकरणांत तत्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि विशेष पथकांच्या मदतीने गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. मात्र, यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

बालसुरक्षेसाठी उपाय

  • मुलांना अनोळखी तसेच ओळखीच्या व्यक्तींविषयी सतर्कतेचे धडे देणे

  • ‌‘गुड टच-बॅड टच‌’बाबत जागरूकता वाढविणे

  • शाळा व परिसरात सुरक्षा यंत्रणा बळकट करणे

  • पालकांनी मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे

  • संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवणे

लहान मुलांवरील गुन्ह्यांमध्ये अनेकदा आरोपी हे पीडितांच्या ओळखीतील असल्याचे तपासात दिसून येते. त्यामुळे पालकांनी मुलांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, तसेच कोणतीही संशयास्पद बाब तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. पोलिसांकडून जनजागृती आणि प्रतिबंधक उपाययोजनांवरही भर दिला जात आहे.
बसवराज तेली, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT