पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी व बोपोडी असा मुळा नदीवर पूल उभा केला आहे. त्यासाठी महापालिकेने 32 कोटी 36 लाख रुपये खर्च केले आहे. त्यानंतर पुलाच्या सुशोभिकरणावर आणखी तब्बल 20 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. आर्थिक स्थिती डबघाईत असताना महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या या उधळपट्टीवरुन संताप व्यक्त केला जात आहे. निव्वळ टक्केवारीसाठी तसेच, बांधकाम व्यावसायिकांच्या भल्यासाठी अव्वाचा सव्वा खर्च करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत.
महापालिकेकडून सांगवी ते बोपोडीत स्मशानभूमी रस्ता असा मुळा नदीवर पूल उभारण्याचे नियोजन होते. मात्र, भाजपाच्या सन 2017 च्या सत्ताकाळात जागा बदलून सांगवी ते औंध चौकातील चंद्रमणी नगर असा पूल बांधण्यास मान्यता देण्यात आली. पुलाचे भूमिपूजन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते 5 जानेवारी 2022 ला झाले. त्यासाठी स्थापत्य प्रकल्प विभागाकडून तब्बल 32 कोटी 36 लाख रुपये खर्च करून 760 मीटर लांबीचा पूल तयार करण्यात आला. ते काम टी ॲण्ड टी इन्फ्रा लिमिटेड ठेकेदार कंपनीने केले असून, संथ गती कामामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी अनेक झाडेही तोडण्यात आली. या पुलाचे लोकार्पण दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 14 ऑक्टोबर 2024 ला झाले. त्या वेळी त्यांनी शहरातील अनेक पूल व विकासकामाचे उद्घाटनही केले होते. त्यानंतर प्रशासकीय राजवटीत स्थापत्य प्रकल्प विभागाने पुलावर विद्युत सुशोभिकरणाचे स्वतंत्र दुसरी निविदा काढण्यात आली. त्यावर आखणी तब्बल 20 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यात 28 मीटर उंचीची 650 टन वजनाची लोखंडी कमान उभारण्यात आली.
त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्या कामासाठी पुल तब्बल 10 महिने बंद ठेवण्यात आला होता. त्या सुशोभिकरणाचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते 7 एप्रिल 2026 ला करण्यात आले. तसेच, पुलाचे सरकार शितोळे सेतू असे नामकरण करण्यात आले. एकाच पुलाचे दोन वेळा उद्घाटन करून महापालिका प्रशासनाने तसेच, सत्ताधाऱ्यांनी आपल्या ‘श्रीमंती’ तसेच, उधळपट्टीचे प्रदर्शन केले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या डबघाईस आली आहे. असे असताना प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून पुलाच्या सुशोभिकरणावर तब्बल 20 कोटी 14 लाखांचा खर्च करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. निव्वळ टक्केवारीसाठी तसेच, बांधकाम व्यावसायिकांच्या भल्यासाठी फारशी वर्दळ नसलेल्या आणि फारसा वापरात न येणारा पूल उभारण्याचा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
चुकीचा ठिकाणी बांधला पूल
सांगवीतील ममतानगर आणि बोपोडी येथील स्मशानमूमी रस्ता असा हा पूल बांधण्यात येणार होता. मात्र, ती जागा रद्द करून सांगवीतील दत्त आश्रम मठ ते औंध चौकातील चंद्रमणीनगर असा पूल बांधण्यात आला आहे. ती जागा चुकीची असल्याचे नागरिकांसह वाहनचालक म्हणत आहेत. औंध चौकात पुलावर येण्यास कनेक्टिव्हीटी नाही. वळसा घालून किंवा विरुद्ध बाजूने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, या पुलामुळे अंतरात फारसा फरक पडत नसल्याने वाहनचालक त्याचा वापर करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुलावरून तुरळक वाहनांची ये-जा होते. रात्रीच्या वेळेत मद्यपी तसेच, प्रेमी युगुल पुलावर बसलेले असतात.
जोडरस्ते नसल्याने पुलाचा वापर कमी
पुलाच्या दिशेने जाण्यासाठी सांगवीतील भागात जोड रस्ते नाहीत. ममतानगर, मुळानगर, पवारनगर या भागात अरुंद रस्ते आहेत. अतिक्रमण वाढले आहे. रस्त्यांवर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात मोटारी, मिनी बस, ट्रॅव्हल बस पार्क केलेल्या असतात. तसेच, रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अंधार असतो. त्यामुळे अरुंद रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी, पुलावरून ये-जा करण्यास पसंती दिली जात नाही. त्यापेक्षा स्पायसर महाविद्यालय येथील पुलावरुन थेट ब्रेमेन चौकात जात येत असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.
खर्च कमी दाखवण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा
पुलाचा खर्च कमी दाखवण्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने एकाच कामाचे दोन तुकडे करून निविदा काढली आहे. लोकवस्ती नसलेल्या, फारशी वर्दळ नसलेल्या भागांत पूल उभारण्यासाठी त्या विभागाने ही शक्कल लढवली आहे. आता ती दोन्ही कामे वेगळी होती. एका नेत्यांने सुशोभिकरणाचा खूपच हट्ट धरला होता, अशी कारणे देत अधिकार्यांकडून खर्चाचे समर्थन केले जात आहे. तर, निव्वळ टक्केवारी वाढविण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पुलाचा निम्मा खर्च पुणे महापालिकेने केला आहे.
पूर आल्यास पूल जाणार पाण्याखाली
हा 760 मीटर लांबीचा पूल महापालिकेने तब्बल 32 कोटी रुपये खर्च करून बांधला आहे. मात्र, पावसाळ्यात पूर आल्यास तो पूल पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे तो पूल पावसाळ्यात वाहनालकांना वापरता येणार नाही. त्यामुळे अशा पुलाच्या सुशोभिकरणावर इतका खर्च करण्याची गरज नव्हती, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करावी
गैरव्यवहार व भ्रष्टाचारामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली असताना, महापालिका कर्जबाजारी झालेली असताना, ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी पैसे नसताना अशा प्रकारे कोट्यवधी रुपये पुलाच्या सुशोभिकरणासाठी खर्च केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला आहे. पूल बांधणे व सुशोभिकरण कामाची सखोल चौकशी व्हावी. मूळ निविदेनंतर दर कसा फुगवण्यात आला. वारंवार मुदतवाढ देण्यात आली. वापरात आलेले साहित्य व बाजारभावातील त्याचे दर तपासण्यात यावेत. दोषी अधिकारी व ठेकेदारांकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिकांसाठीच प्रशस्त पुलाची उभारणी
पुलाच्या सांगवीकडील बाजूस सर्व रस्ते अरुंद तसेच गल्लीतील अंतर्गत रस्ते आहेत. तेथून फारशी वाहतूक होत नाही. तरीसुद्धा हा पूल 18 मीटर रुंदीचा बांधण्यात आला आहे. सांगवीकडील बाजूस असलेल्या खासगी जागेत बांधकाम व्यावसायिकांकडून व्यापारी व गृहप्रकल्प विकसित केला जाणार आहे. या भागातील सर्वच रस्ते अरुंद असताना हा पुल त्या बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर पोहचण्यासाठी करण्यात आला आहे. काही पदाधिकारी व नगरसेवकांचा त्यामध्ये आर्थिक रस आहे. त्यासाठीच प्रशासनाकडे पुलाच्या सुशोभिकरणासाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाकडून मोठी उधळपट्टी करण्यात आली. हा पूल निळ्या पूररेषेत बांधण्यात आल्याने पावसाळ्यात पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाणार आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.