पिंपरी: भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे. फोडाफोडीचे प्रमाण भाजपाकडून अधिक असल्याने या पक्षात नाराजांचे प्रमाण जास्त आहे; तसेच अनेक इच्छुकही नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीचा आक्रोश कोणाला भोवणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. परिणामी, बहुतांश प्रभागातील अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज करण्यासाठी सत्ताधारी महायुतीतील भाजपा तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अक्षरश: चढाओढ लागली आहे. ज्या प्रभागात पक्षाचा नगरसेवक नाही किंवा पॅनेल कमकुवत आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातील इच्छुक तसेच, माजी नगरसेवकांना प्रवेश दिला जात आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात हे प्रमाण अधिक आहे.
माजी नगरसेवक, पदाधिकारी, निष्ठावंत व इच्छुक ज्यांच्या विरोधात लढले. गेली 9 वर्षे जीवाचे रान केले. पक्षासाठी सर्वस्व पणाला लावले. पक्षाने दिलेला कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवला. घरची कामे तसेच, स्वत:चा व्यवसाय व नोकरी बाजूला ठेवून, अनेकांनी पक्ष कार्यात स्वत:ला झोकून देऊन काम केले. त्या ठिकाणी पक्षाकडून दुसऱ्या पक्षातील म्हणजे विरोधकांना थेट प्रवेश दिला जात आहे. त्यांना उमेदवारीचे खात्री दिली जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून आस लावून बसलेल्या इच्छुकांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. विरोधकांना डोक्यावर बसले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांसाठी घरोघरी जाऊन मते कशी मागायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
भाजपामध्ये माजी महापौर संजोग वाघेरे व माजी नगरसेविका उषा वाघेरे यांना प्रवेश दिल्याने भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे यांचे भाजपात स्वागत झाल्याने तेथील भाजपाचे पदाधिकारी व इच्छुक नाराज झाले आहेत. त्यांनी आत्मक्लेश आंदोलन करून आपली नाराजी प्रकट केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांना भाजपाने पक्षात घेतल्याने तेथील भाजपाचे माजी नगरसेवक तसेच, पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रकार परिषद घेत विरोध दर्शविला आहे. या फोडाफोडीमुळे नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांचा फटका भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार, असे चित्र निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठींना ती नाराजी दूर करण्यात यश मिळत नसल्याचे दिसत आहे. नाराज मंडळींच्या आक्रोशाचा कोणाला फटका बसणार, कोणाचा फायदा होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. नाराज मंडळींनी ठरविल्यास ते एकाद्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ही करू शकतात. त्यामुळे त्या प्रभागांतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाराज इच्छुक, पदाधिकारी संभ्रमात
फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज इच्छुक व पदाधिकारी संभ्रमात आहेत. ही नाराजी वाढत असल्याने उमेदवारी अर्ज घेण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन दिवसांत तब्बल 1 हजार 491 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. त्यात बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. बंडखोरांनी उमेदवारी अर्ज घेण्यात आघाडी घेतल्याने या दोन पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
तिकिटासाठी धाकधूक!
होणार होणार म्हणत तब्बल चार वर्षांनंतर अखेर, महापालिकेची निवडणूक लागली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही उमेदवारी अंतिम न झाल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. तब्बल नऊ वर्षानंतर महापालिका निवडणूक होत आहे. फेब्रुवारी 2017 ची निवडणूक झाल्यानंतर अनेकांनी प्रभागात तयारी सुरू केली होती. कोरोना महामारी व इतर कारणांमुळे निवडणूक लांबणीवर पडली. त्या चार वर्षांच्या कालावधीत इच्छुकांनी आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे केली. पक्षाकडून तिकीट मिळणार या खात्रीने अनेकांनी प्रचारही सुरू केला. मोठा खर्च केला.
क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करून विजेत्यांना तब्बल 25 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत लाखोंची भेटवस्तू बक्षीस स्वरुपात वाटण्यात आली आहेत. दररोज जेवणावळ्या सुरू आहेत. राज्यात विविध ठिकाणी देवदर्शन, सहलीचे आयोजन करण्यात आले. रॅली, मेळावे, बैठका, माहिती पत्रक वाटप, सोशल मीडियावर प्रचार, मतदार याद्यांची खरेदी, प्रभागातील मतदारांचे सर्वेक्षण, फ्लेक्स व किऑक्स लावून जाहिरातबाजी आदींवर पाण्यासारखा कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन दोन दिवस झाले. अद्याप कोणाचे तिकीट कॅन्फर्म झाले नाही. अद्याप तिकीट न मिळाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अनेकांना रात्रीची झोप लागत नाही नसून, त्याची धडधड वाढली आहे. उमेदवारी न मिळाल्यास अनेकांची राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. परिणामी, झालेला खर्च कसा भरून काढायचा असा प्रश्नही त्यांना सतावत आहे. तिकिटासाठी इच्छुकांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे.