BJP Corporators Training Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad BJP Corporators: पिंपरीतील भाजप नगरसेवकांना ‘शिस्तीचे धडे’; फडणवीस घेणार प्रशिक्षण

गटतट आणि समन्वयाच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण; महापालिका कारभार, पक्षशिस्त आणि संघटनात्मक समन्वयावर मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये असलेल्या गटतटामुळे वेगवेगळे प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे नाहक भाजपची बदनामी होत आहे. सत्ता टिकवण्याबरोबरच पक्षांतर्गत शिस्त आणि समन्वय राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि महापालिकेच्या कारभाराचे धडे देण्यासाठी भाजपकडून पाच आणि सहा ऑक्टोबरला निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित राहून नगरसेवकांना धडे देणार असून, पक्ष शिस्तीबाबत संवाद साधणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने 84 जागांसह सत्ता दुसर्‍यांदा ताब्यात घेतली आहे. एवढे मोठे संख्याबळ मिळाल्यानंतर नगरसेवकांची वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा, स्थानिक नेत्यांमधील मतभेद आणि गटतटांचे राजकारण यामुळे पक्षांतर्गत व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांचे प्रशिक्षण भाईंदर, मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. पक्षाच्या पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानअंतर्गत राज्यतील विविध महापालिकांतील भाजप नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत.

या प्रशिक्षणास मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. ते नगरसेवकांना शिस्तीचे तसेच, महापालिका कामकाजाचे धडे देणार आहेत. महापालिकेतील पदे, समित्या आणि विविध विषयांवरून नगरसेवकांमध्ये स्पर्धा वाढली आहे. पक्षसंघटनेशी बांधिलकी, सामूहिक निर्णय आणि प्रशासनाची समन्वय यावर प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे.

कमिटीकोअर कमिटीने टोचले कान

भाजप पक्षाची शहराची कोअर कमिटी आहे. या कमिटीकडून पिंपरी-चिंचवड शहर आणि महापालिकेसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे, कोणते धोरण सुरू ठेवायचे, त्याबाबत कमिटीकडून महापालिका पदाधिकार्‍यांना सूचना दिल्या जातात. त्याप्रमाणे पदाधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. मात्र, पदाधिकार्‍यांमध्ये एकवाक्यता नसल्याने एका विषयांवर वेगवेगळी मत प्रदर्शन पदाधिकार्‍यांकडून केले जात असल्याने पक्षशिस्तीचे वाभाडे निघत आहेत. त्यावरुन कोअर कमिटीने पदाधिकार्‍यांना शिस्तीचे डोस दिले आहेत. या निवासी प्रशिक्षणानंतर नगरसेवकांच्या कामकाजात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT