Pimpri Chinchwad Bribe Case Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Bribe Case: सत्तर हजारांची लाच घेताना बीट निरीक्षकाला अटक

पिंपळे गुरवमधील बांधकामावर कारवाई न करण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपळे गुरव येथील एका गुंठ्यातील तीन मजली अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार नाही, असे सांगून 70 हजारांची लाच स्वीकारणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीट निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी (दि 11) रंगेहाथ पकडले आहे.

उमेश अरुण लोंढे (वय 28, रा. शिवराजनगर, रहाटणी) याला लाचेची रक्कम घेताना रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये अटक करण्यात आली. याप्रकरणी एका 58 वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे.

तक्रारदार यांची पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा असून, त्यांनी तीन मजली बांधकाम केले आहे. मात्र, महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचे दर्शवून महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाकडून 25 फेब्रुवारीला तक्रारदारांना नोटीस बजावण्यात आली होती.

त्या नोटिसीविरोधात तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन तक्रारदार यांना महापालिकेत जाऊन नियमानुसार दंड भरून त्यांनी केलेले बांधकाम नियमित करून घेण्याबाबचे आदेश देण्यात आले होते.

त्यानंतर बांधकाम नियमित करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उमेश लोंढे हा ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणार्‍या पिंपळे गुरव वॉर्ड अतिक्रमण विरोधी विभागाचा बीट निरीक्षक म्हणून काम पाहत होता. त्या वेळी लोंढे याने तक्रारदार यांना भेटण्यास बोलवून अनधिकृत बांधकाम पाडावे लागेल, असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने निकालाची प्रत दाखवली.

मात्र, लोंढे याने उच्च न्यायालयाचा निकालाकडे दुर्लक्ष केले. तीन मजली इमारत अनधिकृत असल्याचे सांगून, त्या इमारतीवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई न करण्यासाठी 70 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर आज सायंकाळी पाचच्या सुमारास ड क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लोंढे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच ‘तो’ रूजू झाला होता

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उमेश लोंढे हा ड क्षेत्रीय कार्यालयात बीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. लाड-पागे समितीच्या माध्यमातून त्याला अनुकंपा तत्त्वावर तीन महिन्यांपूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर रूजू करून घेतले होते. बी. ई. सिव्हिलपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT