Water Crisis pudhari photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! पाण्याची नासाडी केल्यास होणार कारवाई

टंचाई टाळण्यासाठी पाणीपुरवठ्यात 10 % कपात

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: अपुर्‍या पावसामुळे व आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडशहरात दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर विशेष तपासणी पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.

पाण्याची नासाडी करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि. 15) केले आहे.

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा तसेच, पुढील वर्षी राज्यात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून पुढील वर्षी 31 ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सर्व महापालिका आणि इतर संबंधित संस्थांनी पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

त्यानुसार पाण्याचे नियोजन व काटकसरीच्या वापरासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार शहरात 31 ऑगस्टपर्यंत दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे नियमित वेळेपेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.

शहरात पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी विशेष तपासणी पथकांमार्फत पाहणी केली जाणार आहे.पाण्याचा अपव्यय आणि नासाडी करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

एसटीपी बंद ठेवणार्‍या हाऊसिंग सोसायटीचे नळजोड तोडणार

शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी व झाडांना पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा. एसटीपी बंद ठेवणार्‍या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्यात येतील, असा इशाराही महापालिकेने दिला आहे. पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणार्‍या सोसायट्यांना पालिकेच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे

बांधकामासाठी एसटीपीतील प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक

बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर न करता महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) उपलब्ध होणार्‍या प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर करावा.

नदीतून अनधिकृतरीत्या पाणी उपसून ते विहिरीत किंवा टाकीत साठवून टँकरद्वारे विक्री करणार्‍यांनी हा प्रकार तातडीने बंद करावा. अशा प्रकारचा अनधिकृत उपसा आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

वॉशिंग सेंटरवर गुन्हे दाखल करणार

शहरातील सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृतरीत्या पिण्याच्या पाण्याचा नळजोड वापरला जात असल्यास तो तातडीने बंद करण्यात येईल. तसेच, संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. वाहनांची धुलाई, टेरेस, रस्ते व अंगण धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. पाणी शिळे झाले म्हणून फेकून देऊ नये.

विनाकारण पाण्याचा नाहक साठा करू ठेवू नये. शौचालय व आंघोळीसाठी मर्यादित पाण्याचा वापर करावा. गळके नळ तसेच, गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका व्यावसायिकांना पाणी देणार नाही

व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प आणि इतर बिगर घरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था स्वतः करावी. घरगुती वापर, शाळा व रुग्णालये यांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

मोटार लावून पाणी खेचल्यास दंडात्मक कारवाई

नवीन गृहप्रकल्पांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यांना पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित व्यासाचे नळजोड देण्यात येतील. महापालिकेच्या नळजोडाला विद्युत मोटार पंप लावून पाणी उपसा केल्याचे आढळल्यास संबंधित विद्युत पंप जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वॉशिंग सेंटर आणि इतर मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना नवीन नळजोड दिले जाणार नाहीत.

टाकीतून पाणी वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी

इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांमधून पाणी वाहून जाणार नाही किंवा गळती होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. रस्त्यावरील पाणीपुरवठ्याच्या वाहिन्यांमधून होणारी गळती निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने पाणीपुरवठा विभागाला द्यावी. भूजलपातळीही पुरेशी नसल्याने बोअरवेलच्या पाण्याचा वापरदेखील जपून व आवश्यक तेवढाच करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पाणी बचतीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

आज वाचविलेला प्रत्येक थेंब उद्याची आणि पुढील वर्षाची पाणी सुरक्षितता निश्चित करेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी बचतीच्या या प्रयत्नांत महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT