पिंपरी : पैज लावून अतिप्रमाणात दारू पाजल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवार (दि. 30) दुपारी 3 वाजताच्या सुमारास नवलाख उंबे येथील एका शेतात घडली.
या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक दीपक खरात यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कृष्णा सिंह (35, नवलाख उंबे, मूळ- रोहतास, बिहार) आणि विकास कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कृष्णा सिंह याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मृत रामकुमार साह याला पैज लावून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू पिण्यास भाग पाडले. दारूच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला वैद्यकीय उपचार दिले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली. तळेगाव एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.