Ajit Pawar interacting with activists and office bearers
कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांसह संवाद साधताना अजित पवार  पुढारी
पिंपरी चिंचवड

पिंपरी | अजित पवार 'डॅमेज कंट्रोल मोड'वर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षांसह अनेक नगरसेवकांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत धक्का दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकार्‍यांसह माजी नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली. शहराध्यक्षांसह पक्षाची पुनर्बांधणी करून लवकरच निवडी करण्याबाबत चर्चा केली.

नवीन शहराध्यक्ष कोण असणार?

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार होते. मात्र, ते गुरुवारी अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीला उपस्थित होते. पुण्यात झालेल्या बैठकीला पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्यासह पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराध्यक्षच दुसर्‍या पक्षात गेल्याने नवीन शहराध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली. लवकरच नवीन शहराध्यक्ष नियुक्त केला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवरांचा विश्वास

या वेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकार्‍यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल, असा विश्वास असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

रविवारी चिंचवडमध्ये बैठक

चिंचवड येथे रविवारी (दि. 21) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्येक आजी-माजी नगरसेवक सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी व्यक्तिशः संवाद साधणार आहेत. या बैठकीतच शहराध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT