Pimple Nilakh Garbage Dump Art Failure Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Nilakh Garbage Dump Art: 'वेस्ट टू आर्ट' उपक्रमावर पाणी! पिंपळे निलखमध्ये स्वच्छता मोहिमेच्या एका दिवसातच दुसऱ्या ठिकाणी कचराकोंडी

रांगोळी काढून सुशोभीकरण; तरीही नागरिकांनी टाकलेला कचरा, 'स्वयंशिस्त नसेल तर मोहिमांचा काय उपयोग?' प्रशासनाच्या सातत्यावर नागरिकांचा थेट सवाल.

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे निलख : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पिंपळे निलख परिसरातील मुख्य बसथांबा व डीपी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेस्ट टू आर्ट उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. रस्त्याकडेला साचलेला कचरा उचलून त्या ठिकाणांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली.

नागरिकांच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेथे रांगोळी काढून सुशोभीकरण केले. कचरा टाकण्याचे ‌‘डंप स्पॉट‌’ सुंदर ठिकाणात रूपांतरित करण्यात आले; परंतु नागरिकांनी ती जागा सोडून त्याच भागात दुसऱ्या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महापालिकेच्या या उपक्रमावर अक्षरश: नागरिकांनी पाणी फिरवले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपक्रम राबवून एक दिवसही पूर्ण उजाडला नाही, तोच डीपी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यात नागरिकांनी काही अंतर सोडून कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसराला बकालपणा येत असून, या कचर्ऱ्याच्या ढिगामध्ये मोकाट जनावरे अन्नाचा शोध घेताना दिसून येत आहेत. अन्नाचा शोध घेताना जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठांनी संताप व्यक्त केला. ही मोहीम फक्त फोटो सेशन पुरतीच का? सातत्य नसेल तर स्वच्छता मोहिमांचा काय उपयोग, असा सवाल नागरिकांनी प्रशासनाला थेट केला आहे.

स्वयंशिस्त गरजेची

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु, नागरिकांचा त्याला प्रतिसाद मिळत नाही. यामुळे कचराकुंडीमुक्त शहर उपक्रम राबवूनही शहरातील बहुतांश रस्त्यांवर कचर्ऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून वेस्ट टू आर्ट उपक्रम राबविला जात आहे; परंतु नागरिक त्याच परिसरात कचरा टाकत असल्याने असे उपक्रम राबवून फायदा कोणाचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत नागरिक स्वयंशिस्त पाळणार नाहीत, तोपर्यंत असेच होत राहणार आहे. तसेच महापालिकेनेदेखील कचरा संकलन नागरिकांच्या सोयीनुसार अथवा दोन वेळा केले तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत, असे नागरिक सांगत आहेत.

आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवत आहोत. जे कोणी रात्री किंवा जाणीवपूर्वक कचरा टाकत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीदेखील आपला परिसर स्वच्छ, सुंदर कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकला, तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत.
शांताराम माने, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT