पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संथ आणि उदासीन कारभाराचा फटका पिंपळे गुरवमधील शेकडो विद्यार्थ्यांना बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. येथील कै. शेवंताबाई खंडूजी जगताप विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम तब्बल पाच वर्षांपासून रखडले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रखडलेल्या कामामुळे पालक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एकीकडे शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असल्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. अनेक निवेदने पाठपुरावा आणि मागण्या करुनही कामाला गती मिळत नसल्याने संताप वाढत आहे.
जीव मुठीत धरून शाळेचा प्रवास
नवीन इमारतीचे काम अपूर्ण असल्यामुळे जगताप विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या शेल पेट्रोल पंपाजवळील पर्यायी शाळेत सुरू आहे. मात्र, हा पर्याय विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सुदर्शननगर वैदुवाडी प्रभातनगर, जवळकरनगर तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना दररोज लांबचा प्रवास करावा लागत आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना मोठ्या वाहतुकीच्या रस्त्यांवरून जावे लागते. या मार्गांवर अवजड वाहने भरधाव दुचाकी आणि वाढती वाहतूक असल्याने अपघाताचा धोका कायम निर्माण झाला आहे
निवेदने दिली; तरीही प्रशासनाचे मौन
या संपूर्ण प्रकरणाबाबत महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाला अपेक्षित गती मिळालेली दिसून येत नाही. परिस्थितीची पूर्ण माहिती असूनही प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या हद्दीतील एका शाळेचे बांधकाम पाच वर्षांत पूर्ण करता येत नसेल तर विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिका आता तरी जागी होणार का? असा सवाल पिंपळे गुरवकरांकडून उपस्थित केला जात आहे. जगताप विद्यालयाच्या रखडलेल्या कामाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.
नागरिकांची मागणी
जगताप विद्यालयाचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात
शाळा बांधकामासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा
स्मार्ट सिटीच्या दाव्यांना तडा
शहरात विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना महापालिकेच्या शाळांची बांधकामे मात्र रखडल्याचे वास्तव समोर येत आहे. काही ठिकाणी इमारतींची कामे सुरू होऊनही निधी अभावी किंवा प्रशासकीय अडथळ्यांमुळे प्रकल्प अर्धवट पडले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेल्या शहरात आजही अनेक शाळांच्या इमारती वर्षांनुवर्षे अपूर्ण राहिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या जागेत किंवा पर्यायी इमारतींमध्ये शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र चिंताजनक आहे.
शाळेच्या पटांगणात एका कुटुंबाचे घर असल्यामुळे बांधकामाचे काम काही काळ बंद होते. कुटुंबाला मोबदला दिल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, निवडणुकीच्या कामामुळेही काही प्रमाणात विलंब झाला होता. सुरुवातीला जी प्लस टू इमारतीचे नियोजन होते. मात्र, आता त्या ठिकाणी पाच मजली शाळेची इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बिल्डिंग परवानगीही घेण्यात आली असून, सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर मूळ आराखड्यानुसार पाच मजली इमारत उभारली जाणार आहे. या कामाची वर्क ऑर्डर 2023 मध्ये देण्यात आली असून, पुढील वर्षापासून शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.प्रसाद देशमुख, उपअभियंता, ड क्षत्रिय कार्यालय, महापालिका
शाळेचे बांधकाम इतकी वर्षे रखडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुलांना दररोज दूरच्या शाळेत पाठवावे लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यायला हवा. शाळेच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करून मुलांना त्यांच्या मूळ शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.शिवाजी पाडुळे, सामाजिक कार्यकर्ता