पिंपळे गुरव: येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा बाजूस मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदेशीर चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिक आणि पादचारी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या बेशिस्त पार्किंगमुळे दिवसेंदिवस येथील रस्ते अरुंद होत चालले आहेत. परिसरात दररोज वाहतूककोंडी आणि अपघातांचे सत्र सुरूच आहे. या धूळखात पडलेल्या आणि भंगार वाहनांवर वाहतूक पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून ती हटवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
काटेपुरम चौक ते रामकृष्ण चौक, रामकृष्ण चौक ते पेरूची बाग (नर्मदा गार्डनकडे जाणारा रस्ता), सृष्टी चौक ते कल्पतरू चौक, कांकरिया गोडाऊन ते डायनासोर गार्डन चौक, पिंपळे गुरव पोलिस ठाणे ते तुळजाभवानी मंदिर, एम. के. चौक ते कोकाटे हॉस्पिटल, वैदू वस्ती चौक ते जगताप पेट्रोल पंप या अत्यंत गजबजलेल्या मार्गांवर दुतर्फा वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आडोशाचा फायदा
भरदिवसा, सायंकाळच्या सुमारास आणि रात्री अपरात्री पार्क केलेल्या वाहनांच्या आडोशाला शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी अश्लील चाळे करताना आढळून येतात. या प्रकारांमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना प्रचंड संकोच आणि लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच, रात्रीच्या सुमारास टवाळखोर मद्यपान करून आपापसात वादविवाद करत असतात. याचा नाहक त्रास तेथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना वारंवार सहन करावा लागतो.
अपघातांचे सत्र, नागरिकांची सुरक्षा धोक्यात
अरुंद झालेल्या रस्त्यांमुळे येथे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. काही महिन्यांपूर्वीच रस्ता ओलांडत असताना एका गरोदर महिलेला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याची गंभीर घटना येथे घडली होती. या घटनेनंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. ही बेवारस आणि भंगार वाहने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी आडोसा ठरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाहतूक पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे आणि रस्त्याला विळखा घालणाऱ्या या चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ती तात्काळ जप्त करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून, नुकताच सांगवी पोलिस ठाण्यात एक धक्कादायक गुन्हा दाखल झाला आहे. पेरूच्या बागेच्या रस्त्यावर चारचाकी वाहनाने आलेल्या दोघांनी पिंपळे गुरव येथील एका २८ वर्षीय युवकाला बळजबरीने गाडीत बसवले. त्याला बेदम मारहाण करून त्याची सोन्याची चैन आणि रोख रकमेसह एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याने सध्या परिसरात कमालीचे चिंतेचे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वच्छतेचा बुरखा आणि आरोग्याचा प्रश्न
रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या या वाहनांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाला रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्यात मोठे अडथळे येत आहेत. त्यातच अनेक वाहने दीर्घकाळापासून एकाच जागी धूळखात आणि भंगार अवस्थेत पडून आहेत. या उभ्या वाहनांच्या आडोशाला अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
नुकताच मी सांगवी वाहतूक विभागाचा ताबा घेतला आहे. याबाबतची माहिती मिळाली आहे. पिंपळे गुरव परिसरात मी पाहणी करून तसे आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.चंद्रकांत वाबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग
पिंपळे गुरव परिसरातील मराठी व इंग्रजी शाळांच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. येथे दररोज अपघात घडत आहेत. प्रशासनाला एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का?मेघना काजवे, नागरिक