llegal domestic gas cylinder use Pudhari
पिंपरी चिंचवड

Illegal Domestic Gas Cylinder Use: उपनगरांत घरगुती गॅसचा होतोय व्यावसायिक वापर; नियमांना हरताळ

प्रशासन झोपेत की संगनमतात; नागरिकांचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

उमेश सणस

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे ‌‘दैनिक पुढारी‌’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचा व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु पिंपळे गुरव व इतर ठिकाणी नियमांची पायमल्ली करत घरगुती सिलिंडर वापरला जात आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामाविषयी शंका उपस्थित केली आहे.

शासनाच्या नियमानुसार घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी करणे बेकायदेशीर आहे. उद्योगधंदा व हॉटेल व्यवसायासाठी कमर्शियल सिलिंडरची व्यवस्था केली आहे. मात्र, खर्च वाचवण्याच्या नादात वडापाव, इडली, उडीद वडा, चहाची टपरी तसेच इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सुरू असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

इराण आणि इस्राईल, अमेरिका युद्ध सुरू असल्याने घरगुती गॅस सिलिंडर अद्याप वेळेत मिळत नाही. दररोज गॅस एजन्सीच्या दारात शेकडो नागरिक गॅसची टाकी घेऊन उभा राहत आहेत. त्यांच्यात गॅससाठी वाद होताना दिसून येत आहेत. ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतर कित्येक दिवस नागरिकांना गॅस मिळत नाही. परंतु व्यावसायिकांना दररोज गॅस कुठून उपलब्ध होतो, हा मोठा प्रश्न आहे.

‌‘गॅस‌’चा पुरवठा इतका सुलभ कसा?

सर्वसामान्य नागरिकांना एका सिलिंडरसाठी 30 ते 45 दिवस प्रतीक्षा करावी लागते. तर काही ठिकाणी जास्त पैसे मोजून सिलिंडर मिळवावा लागतो. अशा परिस्थितीत हे व्यावसायिक स्टॉलधारक वर्षानुवर्षे घरगुती गॅस सहजपणे कसा मिळवतात? गॅस एजन्सी आणि या व्यावसायिकांमध्ये मअर्थपूर्णफ संबंध तर नाहीत ना? असा जळजळीत सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. वितरण व्यवस्थेवर नियंत्रणाचा पूर्ण अभाव आहे की प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

सुरक्षेचा मोठा धोका

भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी घरगुती सिलिंडरवर चालणारे व्यवसाय हा केवळ आर्थिक गैरप्रकार नसून मोठा सुरक्षेचा प्रश्न आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे एकीकडे गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होत असून, गृहिणींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे नियम तोडणाऱ्यांची चंगळ सुरू असल्याने संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

दोषींवर कारवाईची गरज

अन्नधान्य पुरवठा विभागाने विशेष भरारी पथके नेमून सायंकाळच्या वेळी अचानक तपासण्या कराव्यात. संशयास्पद गॅस वितरण करणाऱ्या एजन्सींचे ऑडिट करून दोषी आढळल्यास परवाने रद्द करावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्टॉलधारकांवर केवळ दंड न आकारता त्यांचे परवाने रद्द करून सिलिंडर जप्त करावेत. तसेच गॅस वितरणासाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली लागू करावी, जेणेकरून संशयास्पद वापरावर तत्काळ कारवाई करता येईल. याशिवाय नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याचीही मागणी होत आहे.

प्रशासनाला थेट सवाल

  • नियमांचे उघड उल्लंघन सुरू असताना पोलीस आणि पुरवठा अधिकारी केवळ बघ्याची भूमिका का घेतात?

  • कारवाईसाठी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का?

  • घरगुती गॅस हा सर्वसामान्यांचा हक्क आहे. त्याचाच काळाबाजार सुरू.

  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‌‘गॅस माफिया‌’चे हे जाळे अधिक घट्ट होईल.

घरगुती गॅसचा गैरवापर आढळल्यास आमचे पथक तात्काळ कारवाई करत आहे. कोणीही घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी करत असेल तर कृपया आमच्या संपर्क क्रमांक चिंचवड विधानसभा 9765581818, पिंपरी विधानसभा 7843033473, भोसरी विधानसभा 9850064849 या क्रमांकावर आम्हाला कळवा. आम्ही संबंधितांवर योग्य ती कारवाई करू.
- विजयकुमार क्षीरसागर, अन्नधान्य पुरवठा अधिकारी, निगडी कार्यालय.
गॅस वेळेवर मिळत नाही मात्र, बाहेर तोच गॅस सर्रास वापरला जातो. आम्ही नियम पाळतो मग काही जणांना सुट का? गॅस एजन्सींनीही जबाबदारीने काम करायला हवे. चुकीच्या पद्धतीने गॅस सिलिंडर देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
- स्थानिक महिला
पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित स्टॉलधारकांवर कारवाई करून आमच्याकडे गुन्हे दाखल केले पाहिजेत. म्हणजे असे कृत्य करणार्यांना आळा बसेल.
- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT