पिंपळे गुरव: वल्लभनगर येथील बी. डी. किल्लेदार उद्यान स्थापत्य विभागाकडील ब्लॉक बसविण्याच्या कामामुळे दिवाळीपासून सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ बंद होते. या कालावधीत परिसरातील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. अखेर मागील आठ दिवसांपासून हे उद्यान पुन्हा नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
उद्यान सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी येथील अनेक समस्या अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. उद्यानातील मुलांसाठीची खेळणी तसेच बसण्यासाठीची काही बाकडी तुटलेल्या व जीर्ण अवस्थेत असून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच उद्यानातील स्वच्छतागृहांना
महिला व पुरुष असे स्वतंत्र नामफलक नसल्याने नागरिकांमध्ये संभम निर्माण होत आहे. विशेष म्हणजे सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून बांधलेले दुसरे स्वच्छतागृह कुलूपबंद अवस्थेत आहे. इतका मोठा खर्च करूनही स्वच्छतागृह नागरिकांच्या वापरासाठी खुले न केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.
ब्लॉकच्या कामामुळे काही काळ उद्यान बंद होते. सिंथेटिक ट्रॅक जुना झालेला असून, खर्च जास्त असल्याने बदलाचा निर्णय प्रलंबित आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मधला ट्रॅक दुरुस्त करण्यात आला असून, अंतिम निर्णयानंतर पुढील काम सुरू केले जाईल.निखिल फेन्डर, उपअभियंता, उद्यान स्थापत्य विभाग
खेळणी, बाकडे तुटलेलीच
उद्यान सुरू झाले असले तरी तुटलेली खेळणी व बाकड्यांची तातडीने दुरुस्ती करणे बाकी आहे. बंद स्वच्छतागृह सुरू करणे, तसेच आवश्यक ठिकाणी नामफलक लावणे याबाबत संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिंथेटिक ट्रॅकची दुरवस्था
उद्यानातील सिंथेटिक ट्रॅक सुमारे सात वर्षांपूर्वीचा असून, तो खराब झाला आहे. सिंथेटिक ट्रॅकची साधारण आयुष्य पाच वर्षांचे असते. मात्र, नवीन ट्रॅक बसविण्यासाठी येणारा खर्च अधिक असल्याने सध्या तो बदलण्याचा निर्णय घेतलेला नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्यान तात्पुरते सुरू करण्यात आले आहे. जुने व खराब झालेले टाइल्स काढून टाकून नवीन टाइल्स बसवण्याचा प्रस्ताव असून, हे काम सध्या प्रलंबित आहे.
काम अद्याप पूर्ण झालेले नाही. काही तांत्रिक व प्रशासकीय निर्णय बाकी आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी उद्यान तात्पुरत्या स्वरूपात खुले ठेवले आहे. आवश्यकतेनुसार पुढील कामासाठी उद्यान काही काळ बंद ठेवावे लागू शकते.राजश्री भालेराव, कनिष्ठ अभियंता, उद्यान विभाग
उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छतागृहाची चावी मागितल्यास ती संबंधितांना देण्यात येते. याबाबत तेथील सुरक्षारक्षकास सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि स्वच्छतागृहाचा गैरवापर होण्याची शक्यता असून, त्यावर नियमित देखरेख करणे शक्य नसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छतागृह सध्या बंद ठेवण्यात येत आहे.राजाराम शिरसाट, सहाय्यक उद्यान निरीक्षक, उद्यान