Pimple Gurav Footpath Parking Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Footpath Parking: पिंपळे गुरवमध्ये पदपथावरच वाहनांचा ठिय्या; पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात

भैरवनाथनगरमध्ये चारचाकींचे बेकायदा पार्किंग; ज्येष्ठ, महिला अन् मुलांना मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेले पदपथ सध्या वाहनांच्या पार्किंगसाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव येथील भैरवनाथनगर परिसरात समोर आला आहे. जगताप पाटील पेट्रोल पंपाच्या पुढे भगतसिंग चौकाच्या दिशेने जाताना असलेल्या वळणाजवळ चारचाकी वाहने थेट पदपथावर उभी केली जात असल्याने नागरिकांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

या ठिकाणी रस्ता वळणाचा असल्याने आधीच वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे काहीसे कठीण होते. त्यातच पदपथावर चारचाकी वाहने उभी राहत असल्याने पादचाऱ्यांचा मार्गच बंद होत आहे. परिणामी नागरिकांना वाहनांच्या बाजूने मुख्य रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अपघात होण्यापूर्वी कारवाईची मागणी

या ठिकाणी एखादा गंभीर अपघात घडण्यापूर्वी संबंधित महापालिका विभाग आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने पाहणी करून पदपथावरील वाहनांचे पार्किंग थांबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पदपथ कायमस्वरूपी मोकळे राहतील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पदपथ नेमका कोणासाठी?

पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून पदपथ तयार केले जातात. मात्र, त्याच पदपथावर वाहने उभी राहत असतील तर नागरिकांनी सुरक्षितपणे चालायचे कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पदपथावर वाहनांचा ठिय्या असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पदपथ नेमका कोणासाठी, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

पदपथावर वाहने पार्क केली असल्यास त्याची पाहणी करून संबंधित वाहनांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. नागरिकांना पदपथावरून सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल.
चंद्रकांत वाबळे, वाहतूक पोलिस निरीक्षक, सांगवी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT