पिंपळे गुरव: स्मार्ट सिटीच्या स्वच्छतेच्या गोंडस दाव्यांची पोलखोल पिंपळे गुरव येथील मोरया पार्क लेन क्रमांक 5 मध्ये पाहायला मिळत आहे. येथील एका सोसायटीचे ड्रेनेज चेंबर तुंबल्यामुळे मैलामिश्रित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले असून, गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.
परिसरात पसरली दुर्गंधी रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणेही त्रासदायक झाले असून, दैनंदिन कामकाजावर याचा मोठा परिणाम होत आहे. मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर साचल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून मार्ग काढावा लागत असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना या सांडपाण्यातून वाहने चालवताना घसरण्याचा व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
साचलेल्या सांडपाण्यात डास, माशा व इतर कीटकांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन डेंगू, मलेरियासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. सततची दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याबाबतची भीती यामुळे नागरिक मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र आहे. मोरया पार्क हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. येथे जाण्यासाठी एकच रस्ता असून, पुढे रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना पुढे जाता येत नाही व त्याच रस्त्याने माघारी फिरावे लागते. अशा परिस्थितीत या एकमेव रस्त्यावर साचलेले सांडपाणी नागरिकांच्या अडचणी अधिक वाढवत आहे. मात्र, या समस्येकडे प्रशासनाकडून गांभीर्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
उपाय योजना करण्याची मागणी
ड्रेनेज चेंबर तुंबल्याची माहिती वारंवार देऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ पाहणी करून कर्मचारी निघून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सततच्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे घराबाहेर पडणेही त्रासदायक झाले आहे. वेळेत उपाय योजना न झाल्यास आरोग्याच्यादृष्टीने गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ड्रेनेज विभागास ड्रेनेज जोडणी व तपासण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी ड्रेनेज जोडणीत फॉल्ट आढळल्यास संबंधित सोसायटीला ड्रेनेज विभागामार्फत दंड करण्यात येईल. साफसफाईशी संबंधित कामे आमच्या विभागामार्फत तात्काळ करून घेतली जातील.शांताराम माने, सहायक आरोग्य अधिकारी, ड क्षेत्रीय कार्यालय
हा विषय सोसायटीचा अंतर्गत असेल तर संबंधित काम सोसायटीनेच करणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्यास पर्यावरण विभागाच्या मार्शल पथकाद्वारे नोटीस देऊन नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.अमित दीक्षित, उपअभियंता, जलनिस्सारण विभाग, ड क्षेत्रीय कार्यालय