Pimple Gurav Park Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Park Issue: पिंपळे गुरवच्या ‘८ टू ८० पार्क’समोरील दुभाजकांची दुरवस्था; अपघाताचा धोका वाढला

अनधिकृत पार्किंगसाठी दुभाजक हटवल्याचा आरोप; ज्येष्ठ नागरिक, महिला आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: सुदर्शननगर येथील स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित झालेल्या '८ टू ८० पार्क' उद्यानासमोरील सर्कलच्या दुभाजकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला आणि सौंदर्याला मोठा धक्का पोहोचत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील परिस्थिती 'जैसे थे' असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

'८ टू ८० पार्क' उद्यानामध्ये दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले सकाळी आणि संध्याकाळी नियमित फेरफटका मारण्यासाठी व व्यायामासाठी येत असतात. मात्र, उद्यानासमोरील सर्कलचे दुभाजक अस्ताव्यस्त आणि विखुरलेल्या अवस्थेत पडलेले असल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. अंधाराच्या वेळी किंवा वाहनांच्या वर्दळीत हे दुभाजक न दिसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकी चालक अडखळून पडले असून, काहींना गंभीर दुखापतही झाली आहे.

येथे रोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी याप्रसंगी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असतानाही संबंधित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे सुदर्शन नगर परिसराला सद्यस्थितीत अवकळा आली आहे.

प्रशासनाला कधी येणार जाग?

महापालिकेच्या संबंधित विभागाने या सर्कलच्या दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करून ते पुन्हा योग्य जागेवर बसवावेत. रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे दुभाजक हलवून वाहने पार्क करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. उद्यानाबाहेर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अनावधानाने मोठा अपघात घडण्यापूर्वी महापालिका प्रशासन जागे होऊन यावर तात्काळ तोडगा काढणार का? याकडे आता सुदर्शन नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

अनधिकृत पार्किंग

या दुरवस्थेमागे एक धक्कादायक कारण समोर येत आहे. रात्रीच्या सुमारास परिसरातील काही नागरिक आपली तीन चाकी व चार चाकी वाहने पार्क करण्यासाठी या जागेचा वापर करतात. मात्र, हे दुभाजक वाहन पार्किंगमध्ये अडथळा ठरत असल्याने, काही बेजबाबदार नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे दुभाजक बाजूला सारून अस्ताव्यस्त केले आहेत, जेणेकरून त्यांची वाहने सुरक्षितरीत्या पार्क करता येतील. स्वतःच्या स्वार्थासाठी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.

आजच दुपारी महापालिकेचे कुत्रे पकडणारी वाहन दाखल झाले. या वेळी उद्यान परिसरात भटकी कुत्री पकडताना दोन कर्मचारी याच ठिकाणी पडल्याने मोठी गंभीर दुखापत झाली. अशा अस्ताव्यस्त दुभाजकामुळेच ही घटना घडून आली. याला जबाबदार कोण?
गौतम आदियाल, स्थानिक
याबाबत नुकतीच माहिती मिळाली आहे. सध्या सर्वजण एसआयआरच्या कामात व्यस्त आहेत. परंतु उद्या त्वरित डेप्युटी यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करून तेथील दुभाजक सुरळीत करून घेण्याचे आदेश देत आहे.
सुनील पवार, कार्यकारी अभियंता, मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT