पिंपरी : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघात मतदान केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या पती-पत्नीचे नावे गायब होण्याचा प्रकार पुढे आला आहे.
त्यांची नावे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून वगळून थेट इंदापूर आणि बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणातूनच त्यांचा पत्ता कट झाला आहे. हा प्रकार निवडणूक विभागाने जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इमान शेख यांच्या आई-वडिलांच्या नावाबाबत हा प्रकार घडला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका निवडणूक विभाग व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शेख यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीसाठी इंद्रायणीनगर, गवळीमाथा प्रभाग क्रमांक 8 मधून माझे वडील युनूस शेख आणि नेहरुनगर, मासुळकर कॉलनी,खराळवाडी प्रभाग क्रमांक 9 मधून माझी आई राबिया शेख या इच्छुक आहेत. दोघांपैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी मिळणार होती.
महापालिकेकडून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात चुका व घोळ झाला आहे. आई राबिया यांचे मतदान बारामती विधानसभा मतदारसंघातील शिर्सुफळ येथे गेले आहे. वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर विधानसभेत समाविष्ट केले आहे. मागील 35 वर्षांपासून आमचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये राहत आहे. आम्ही पत्ता बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही. मात्र, परस्पर त्यांचे मतदान बारामती व इंदापूर मतदारसंघात टाकले आहेत. त्यामुळे इच्छुक असूनदेखील आई-वडिलांना महापालिकेची निवडणूक लढता येणार नाही. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तक्रार त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी तसेच, भोर या चार विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदान करता येते. तसेच, महापालिका निवडणूक लढता येईल. मात्र, या मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नसल्यास त्या मतदारास महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार नाही. तसेच, निवडणूक लढता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या एक जुलै 2025 ची मतदार विधानसभानिहाय याद्या महापालिकेकडून 1 ते 32 अशी प्रभागनिहाय फोडण्यात आल्या आहेत. मतदार यादीतून नाव स्थलांतरीत करणे, वगळणे हे अधिकार महापालिकेस नाहीत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.