PCMC Red Zone Map
पिंपरी चिंचवड

PCMC Standing Committee: स्‍थायी समितीसाठी नगरसेवकांची भाऊगर्दी !

२० फेब्रुवारीला १६ सदस्यांची निवड; अध्यक्षपदासाठी भाजपातील दिग्गजांत स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपाची सत्ता आली आहे. एकूण 128 नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेत बहुतांश नगरसेवक स्थायी समिती सदस्य पदासाठी इच्छुक आहेत. तर, अनुभवी व दिग्गज नगरसेवक समिती अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता वाढली आहे. समितीच्या 16 सदस्यांची निवड 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

महापालिकेचे महापौरपदी रवी लांडगे, उपमहापौरपदी शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची निवड शुक्रवारच्या (दि. 6) विशेष सभेत झाली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून ती सभा 20 फेब्रुवारी दुपारी एकपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्या सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यात सत्तारूढ पक्षनेते शितोळे, विरोधी पक्षनेते भोईर आणि शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे हे समितीच्या सदस्यासाठी आपल्या पक्षांच्या नगरसेवकांच्या नावाची यादी महापौरांकडे सादर करतील. त्यानंतर काही दिवसात स्थायी समिती सभेत अध्यक्षपदाची निवड केली जाईल. ती निवड विभागीय आयुक्त कार्यालयाने नेमलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

नगरसेवक संख्येनुसार स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपाचे 11, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) 4 आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 1 सदस्य असणार आहे. साहजिकच समितीचा अध्यक्ष भाजपाचा असणार आहे.

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या स्थायी समितीकडे असतात. महापालिकेचे प्रत्येक विकासकाम, प्रकल्प, योजना, उपक्रम, दौरे, कामे, पुरवठा व इतर कामांना ही समितीच मंजुरी देते. त्यानंतरच त्या संबंधित ठेकेदार किंवा पुरवठादारांला वर्क ऑर्डर दिली जाते. त्यानंतरच त्या बिलाची रक्कमेची तरतूद केली जाते. समितीकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय महापालिकेचे कोणतेही काम पुढे सरकत नाही. त्यामुळे या समितीला महापालिकेच्या कारभारामध्ये सर्वाधिक महत्व आहे.

नाराजांची विषय समितीवर वर्णी

स्थायी समिती अध्यक्ष तसेच, सदस्यपद न मिळाल्याने पक्षात विशेषत: सत्तारूढ भाजपात नाराजी वाढणार आहे. नाराजी दूर करण्यासाठी पक्षनेत्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाईल. नाराज नगरसेवकांची वर्णी शिक्षण, क्रीडा, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण या विषय समिती सभापती व सदस्यपदी केली जाऊ शकते. त्या दृष्टीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील नगरसेवकांची नावे काढली जात आहेत. कोणाला कोणती समिती द्यायची, याचे आराखडे तयार केले जात आहेत. गटातून विषय समितीचेही वाटप केले जाते.

स्थायीच्या अध्यक्षपदी शत्रुघ्न काटे की शीतल शिंदे?

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहे. ते पद चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभा मतदार संघाकडे जाते, त्यावरून नगरसेवकांचे नाव निश्चित होणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व तिसऱ्यांदा निवडून आलेले शीतल शिंदे हे महापौरपदासाठी तीव्र इच्छुक होते. हे पद न मिळाल्याने ते नाराज आता, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आडून बसल्याची चर्चा आहे. तसेच, माजी गटनेते राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक हर्षल ढोरे, माजी उपमहापौर तुषार हिंगे हेही अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

...तर स्थायी समिती अध्यक्षांकडे आयुक्त सादर करतील अर्थसंकल्प

स्थायी समितीचे गठण होऊन, समिती अध्यक्षांची निवड झाल्यास महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर अध्यक्षांकडे महापालिकेचा सन 2027-28 चा अर्थसंकल्प सादर करतील. 28 फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीच्या अध्यक्षांची नेमणूक करणे गरजेचे आहे. 20 फेब्रुवारीला स्थायी समितीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर लगेच सोमवार (दि. 23) ते ते गुरुवार (दि. 26) या कालवाधीत अध्यक्षांची निवड होईल. शुक्रवार (दि. 27) किंवा शनिवार (दि. 28) आयुक्तांकडून अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला जाईल.

विभागीय आयुक्त प्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांची निवड

महापौरांनी शुक्रवारची (दि. 6) विशेष सभा 20 फेब्रुवारी दुपारी एकपर्यंत तहकूब केली आहे. त्या सभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड केली जाऊ शकते. त्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांची वेळ घेऊन, निश्चित केलेल्या दिवशी तिसऱ्या मजल्यावरील मधुकरराव पवळे सभागृहात 16 सदस्यांमधून एकाची अध्यक्षपदी निवड केली जाईल. त्यानंतर दर मंगळवारी स्थायी समितीची साप्ताहिक सभा होईल, असे महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT