Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Sports Department: क्रीडानगरीतच खेळाचा बाजार? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागावर नगरसेवकांचे ताशेरे

बुकींगच्या नावाखाली खेळाडूंकडून दुप्पट शुल्क वसुलीचा आरोप; नवीन क्रीडा धोरणाची मागणी, व्यायामशाळा आणि मैदानांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: श्रीमंत असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून खेळाच्या नावाने काळाबाजार केला जात आहे. सरावासाठी १५-१५ दिवस बुकींग करून, प्रत्यक्ष खेळाडूंकडून दुप्पटीहून अधिक रक्कम घेतली जात आहे. हा प्रकार प्रशासनाला शोभत नाही. क्रीडा विभागाच्या निष्क्रीय कारभारावर सभागृहात सर्व पक्षीय नगरसेवकांकडून ताशेरे ओढण्यात आले. नवीन क्रीडा धोरण तातडीने तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, असा सल्ला सभागृहात देण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. क्रीडा विभागाचे नाव क्रीडा, कला, साहित्य व पर्यटन विकास व सांस्कृतिक विभाग ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यावरुन महापालिका व्यायामशाळेचा मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. स्थानिक संस्थेला सोडून बाहेरील संस्थेला व्यायामशाळा चालविण्यासाठी दिल्या जातात. तेथील साहित्य चोरीस जाते. महिना १० रुपये शुल्क घेण्याचा नियम असताना १ हजार २०० रुपये शुल्क घेतले जात आहे. अशा संस्थांवर कारवाई करावी. व्यायामशाळा व बॅडमिंटन हॉल नियमितपणे स्वच्छ ठेवल्या जाव्यात. बुकींगच्या नावाखाली खेळाडूंची लूट केली जाऊ नये. भोसरी येथील कबड्डी संकुलास प्रवेशद्वार लावावे. कुस्ती आखाड्यांना माती व इतर सुविधांची सोय करावी.

ओपन जीमचे साहित्य तातडीने दुरूस्त करावे. मागणी असेल, तेथे ओपन जीमचे साहित्य बसवावे. पोहता येत नसलेल्या मुलांनाही जलतरण तलावात प्रवेश दिला जावा. नवीन क्रीडा धोरण तातडीने मंजूर करून, क्रीडा विभागास निधी उपलब्ध करून द्यावा, असे मत सभागृहात विविध पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केले. त्यावर क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सादर केलेल्या खुलाशावरून सभागृहाचे समाधान झाले नाही.

क्रीडा विभागाच्या असमाधानकारक कामकाजाच्या चर्चेत धर्मराज तंतरपाळे, रिटा सानप, कुंदन गायकवाड, ऐश्वर्या तरस, उत्तम केंदळे, वर्षा जगताप, नीलेश तरस, राहुल जाधव, विकास साने, योगेश लांडगे, अनुराधा गोरखे, तुषार सहाणे, सागर गवळी, संगीता ताम्हाणे, सारिका मासुळकर, शत्रुघ्न काटे, योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आदींनी सहभाग घेतला.

क्रीडाक्षेत्रातील काळाबाजार थांबवा

पिंपरी-चिंचवड शहराला क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र जिल्हा दर्जा देण्याबाबत आम्ही सन २००२ ला प्रयत्न केले. त्यासाठी केंद्राच्या साई संस्थेशी चर्चा करण्यात आली. मात्र, अनेक क्रीडा संघटनांना अद्याप जिल्हा दर्जा मिळालेला नाही. क्रीडा विभागाकडे निधी नसल्याचे शोकांतिका आहे. क्रीडा विभागाकडे मोठे स्टेडियम, मैदान, हॉल असा अनेक मोठ्या मालमत्ता अहेत. मात्र, खेळातील कामगिरी शून्य आहे. खेळाचा नावाने बाजार मांडला आहे. खासगी संस्थांकडून अगोदरच पंधरा दिवसांचे बुकींग केले जाते. प्रत्यक्ष खेळाडूंकडून दुप्पटीपेक्षा अधिक शुल्क घेतले जाते. हॉल, मैदाने, स्टेडियम स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. खेळ हे महापालिकेच्या उत्पनाचे साधन काही. काळाबाजार थांबला पाहिजे, असे मत सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केले.

चिखली व्यायामशाळेतून साहित्यांची चोरी

महापालिकेच्या चिखली येथील टॉऊन हॉलमधील व्यायामशाळेतील साहित्य चोरीस गेले आहे. गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे ती व्यायामशाळा सुरू केली जात नाही. त्याबाबत क्रीडा विभागाकडून उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहेत, असा आरोप भाजपाचे कुंदन गायकवाड, राहुल जाधव व राष्ट्रवादीचे विकास साने यांच्याकडून करण्यात आला. सहा महिने झाले तरी, अद्याप क्रीडा धोरण तयार होत नसल्याबद्दल विकास साने, योगेश लांडगे, कैलास कुटे, भाऊसाहेब भोईर आदींनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक संस्थांना व्यायामशाळा चालविण्यास देण्यात यावे. क्रीडा विभागप्रमुखांना आर्थिक अधिकार देण्यात यावेत. त्यांना केवळ पोस्टमनचे काम देऊ नये, अशी टीका योगेश बहल यांनी केली. क्रीडा विभागाच्या कर्मचार्‍यांना इतर विभागाचे काम देण्यात येऊ नये. क्रीडा विभागाचे मनुष्यबळ वाढवावे, अशी सूचना कैलास कुटे यांनी केली.

व्यायामशाळा चालविण्यास देण्याचे धोरण ठरवले जात आहे

महापालिकेच्या २०१४ च्या क्रीडा धोरणनुसार महापालिकेच्या व्यायामशाळा चालविण्यास दिल्या आहेत. त्यासाठी २० रुपये डिपॉझिट तर, दरमहा १० रुपये शुल्क घेण्याचा नियम आहे. चिखली टाउन हॉलमधील व्यायाम शाळेत अद्याप साहित्य बसवलेले नाही. व्यायामशाळा देण्याबाबत धोरण ठरवले जात आहे. आवश्यकनेनुसार शहरभरात ओपन जीम उभारण्यात आल्या आहेत. नादुरूस्त साहित्याची तातडीने दुरूस्ती केली जाते, असा खुलासा उपायुक्त पंकज पाटील यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT