Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Revenue Collection 2026-27: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाला ब्रेक; सहा महिन्यांत उद्दिष्टाच्या ४५ टक्केच वसुली

एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान तिजोरीत २,६४६ कोटी जमा; बांधकाम परवानगी विभागही पिछाडीवर, विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षातील 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या पहिल्या सहामाहीतील उत्पन्न घटले आहे. सहा महिन्यांत केवळ दोन हजार 646 कोटी 19 लाख रूपयांचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे. हे उत्पन्न महापालिकेच्या उद्दिष्टांपेक्षा 50 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे महाापालिकेच्या विकासकामांना खिळ बसण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे मूळ 5 हजार 655 कोटी 72 लाख रुपये आणि केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह 9 हजार 322 कोटी 17 लाख रुपयांचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प आहे. महापालिकेला संपूर्ण वर्षात वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधून 2 हजार 788 कोटी रुपये. मालमत्ताकरातून 1 हजार 100 कोटी रुपये, बांधकाम परवानगी विभागामधून 890 कोटी 10 लाख रुपये, मुद्रांक शुल्क 340 कोटी रुपये, भांडवली जमा 201 कोटी रुपये, विविध ठेवीच्या व्याजातून 160 कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागाकडून 119 कोटी रुपये, एलबीटी जुनी थकबाकी 2 कोटी 20 लाख रुपये, आणि इतर विभागांतून 304 कोटी रूपये असे वर्षाला 5 हजार 904 कोटी 68 लाख रूपयांचे उत्पन्न मिळेल असे गृहीत धरण्यात आले आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा कर संकलन आणि बांधकाम परवानगी विभाग आहे. कर संकलन विभागाला 1 हजार 100 कोटी रुपये तर, बांधकाम परवानगी विभागातून वर्षाला 890 कोटी 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, पहिल्या सहामाहीत कर संकलन विभागाने शासकीय निधीसह 610 कोटींचे उत्पन्न मिळाले आहेत. मात्र, यामधील 133 कोटी रुपये शासनाला विविध करापोटी द्यावे लागणार आहेत. त्यामुळे कर संकलन विभागातून जुन्या थकबाकीसह 477 कोटी 28 लाख रूपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. बांधकाम परवाना विभागाने 240 कोटी 69 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला बांधकाम विभाग पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जुलै 2017 मध्ये एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू झाला. मात्र, एलबीटीची जुनी प्रकरणे अद्याप निकाली निघाली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षात 2 कोटी 20 लाख रूपयांचे उत्पन्न एलबीटीच्या जुन्या प्रकरणातून मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, एलबीटी विभागच बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश यापूर्वीच आले आहेत. त्यामुळे पहिल्या सहामहीत एलबीटीमधून महापालिकेला काहीच उत्पन्न मिळालेले नाही.

इतर विभागांचे धरून पहिल्या सहा महिन्यांत एकूण 2 हजार 646 कोटी 19 लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे. हे प्रमाण 50 टक्के असणे आवश्यक असताना केवळ 45 टक्के इतके आहे. उत्पन्न समाधानकारक नसल्याचे भविष्यात विकासकामांना खिळ बसू शकते.

पालिकेस वर्ष अखेरपर्यंत उद्दिष्टाएवढे उत्पन्न मिळेल

महापालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महापालिकेला विविध विभागांतून वर्षभरात एकूण 5 हजार 904 कोटी 68 लाख रूपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहित धरण्यात आले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामहीत एकूण 2 हजार 646 कोटी 19 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे, वर्ष अखेरपर्यंत पालिकेस उद्दिष्टाएवढे उत्पन्न मिळेल, असे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT