Property Tax Bill Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Property Tax Collection: पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या तिमाहीत 526 कोटी मालमत्ता कर वसूल; 4.45 लाख नागरिकांचा सहभाग

ऑनलाइन करभरणा वाढला; वाकड विभाग आघाडीवर, थकबाकीदारांवर जप्तीची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांत तब्बल 526 कोटी 14 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. एकूण 4 लाख 45 हजार 620 जणांनी मालमत्ताकराचे बिल भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.

शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून 7 लाख 44 हजार 630 मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी 4 लाख 45 हजार 620 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. सवलतीबाबत जनजागृती झाल्याने 1 एप्रिल ते 30 जून या तीन महिन्यांत 50 टक्क्यांहून अधिक जणांनी बिल भरले आहे. त्यापैकी 3 लाख 47 हजार 564 जणांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला बचत गटामार्फत घरपोच बिलाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी 30 जूनपर्यंत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक कराचा भरणा केला आहे.

मोठ्या थकबाकीदारांना यापूर्वीच जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. अशा मोठ्या व व्यावसायिक थकबाकीदारांकडे यापुढील काळात लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, जप्ती मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी तात्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

असे भरले नागरिकांनी बिल

  • ऑनलाईन - 407 कोटी 89 लाख

  • रोख- 21 कोटी 47 लाख

  • चेक- 16 कोटी 24 लाख

  • डीडी - 15 कोटी 75 लाख

  • विविध ॲप - 10 कोटी 45 लाख

या मालमत्ताधारकांनी कराचे बिल भरले

  • निवासी- 3 लाख 82 हजार 522

  • बिगरनिवासी - 33 हजार 793

  • मिश्र- 8 हजार 623

  • औद्योगिक - 3 हजार 75

  • मोकळ्या जमीन - 2 हजार 591

  • इतर - 13

वाकड कार्यालयातून सर्वांधिक 72 कोटी 87 लाखांचा भरणा

शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 18 विभागीय करसंकलन कार्यालये आहेत. यामध्ये वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त 72 कोटी 87 लाख रुपयांचा भरणा झाला आहे. पाठोपाठ थेरगावमध्ये 46 कोटी 71 लाख, कस्पटे वस्तीतून 39 कोटी 33 लाख आणि चिखली कार्यालयाने 37 कोटी 95 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. किवळे 38 कोटी 37 लाख, चिंचवड 34 कोटी 47 लाख, भोसरी 34 कोटी 73 लाख, मोशी 31 कोटी 22 लाख, पिंपरीगाव 32 कोटी 53 लाख, सांगवी 26 कोटी, पालिका भवन 28 कोटी 75 लाख, आकुर्डी 23 कोटी 90 लाख, चऱ्होली 17 कोटी 82 लाख, फुगेवाडी 20 कोटी 97 लाख, दिघी-बोपखेल 11 कोटी 88 लाख, तळवडे 11 कोटी 23 लाख, निगडी प्राधिकरण 13 कोटी 25 लाख आणि पिंपरी कॅप कार्यालयात 3 कोटी 99 लाख रुपयांचा कर भरणा झाला आहे.

महापालिका इतिहासात प्रथमच सर्वांत जास्त कर जमा

करसंकलन विभागाने करवसुलीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे, असे महापौर रवी लांडगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT