PCMC Municipal Election Preparation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Municipal Election Preparation: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तयारीचा आढावा

ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी; मतदान जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महापालिका निवडणुकीची तयारी पिंपरी-चिंचवड महापालिका यंत्रणेकडून जोरात सुरू आहे. तयारीचा आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी मंगळवार (दि. 30) घेतला. त्यांना विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. त्यांनी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथील स्ट्रॉंग रूमला भेट देऊन ईव्हीएम मशिनचीही पाहणी केली.

या वेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता तथा निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा ईव्हीएम कक्षप्रमुख प्रमोद ओंभासे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, प्रसार माध्यम समिती सचिव किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, हरविंदरसिंह बन्सल, मनोहर जावरानी तसेच, विविध कक्षांचे प्रमुख उपस्थित होते. आयुक्त हर्डीकर यांनी अभिरक्षा कक्ष, मतमोजणी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच, उमेदवारी अर्ज प्रक्रियेची माहिती दिली. प्रत्येक कक्षामध्ये सुरू असलेले कामकाज, कार्यपद्धती, नोंदवही व्यवस्थापन व प्रशासकीय रचना याची माहिती मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू यांनी घेतली.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे पाहणी करताना ईव्हीएम मशिनची साठवणूक व्यवस्था, सीलबंद स्थिती, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण प्रणाली व कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. मतदानासाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम मशिन व निवडणूक साहित्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध जिल्ह्यातून आणून, स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यांनी मतमोजणी कक्षाची पाहणी केली. मतमोजणीसाठी प्रस्तावित जागा, कक्षांची मांडणी, प्रवेश व निर्गमन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय तयारीबाबत माहिती घेण्यात आली.

मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू यांनी चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. आयुक्त हर्डीकर यांनी आकुर्डी येथील हेडगेवार भवन आणि थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली.

मतदान जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी एलईडी व्हॅनद्वारे मतदान जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांच्या हस्ते महापालिका भवनात करण्यात आला. एलईडी व्हॅनद्वारे मतदानाचे महत्त्व, मतदान प्रक्रिया आदींबाबत व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे. त्यामधून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT