पिंपरी: पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महामेट्रो आणि रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीएमसी मेट्रो स्थानक येथे 'शेअर्ड फीडर ऑटो सेवा' सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे तसेच स्थानकावरून इच्छित ठिकाणी जाणे अधिक सुलभ, सुरक्षित आणि किफायतशीर होणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पूरक ठरणारी ही सेवा मेट्रो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करण्यास मदत करणार आहे. विशेषतः मेट्रो स्थानक आणि निवासी भाग यांमधील अंतर सहजपणे पार करता यावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
सेवेच्या उद्घाटनप्रसंगी महामेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, रिक्षा पंचायतचे पदाधिकारी तसेच पुणे मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
पीसीएमसी मेट्रो स्थानकावरून सध्या पिंपळे सौदागर, काळेवाडी फाटा, चाफेकर चौक आणि चिखली (टाळगाव कमान) या मार्गांवर शेअर्ड फीडर ऑटो सेवा सुरू करण्यात आली आहे. भविष्यात प्रवाशांच्या प्रतिसादानुसार आणखी मार्गांचा समावेश करण्याची शक्यता आहे.
पर्यावरणपूरक आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.