

पिंपरी: हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये महिला सहकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे आयटी क्षेत्रासह शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुरुषांच्या होणाऱ्या छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक पुढारीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयहद्दीतील आत्महत्यांच्या घटनांचा आढावा घेतला असता मागील वर्षभरात सुमारे ५०० पुरुषांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे महिलांच्या तुलनेत ही संख्या जवळपास चारपट आहे.
महिलांवरील अत्याचाराचीच चर्चा
महिलांवरील अत्याचार, छळ आणि मानसिक तणावाबाबत समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. त्यासाठी विविध कायदे, संरक्षण यंत्रणा आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. मात्र, पुरुषांच्या मानसिक आरोग्याविषयी बोलण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबाचा भार, नोकरीतील स्पर्धा, वैवाहिक तणाव आणि सामाजिक अपेक्षांचा दबाव यामुळे अनेक पुरुष मानसिकदृष्ट्या खचत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
आयटी क्षेत्रातील ताण जीवघेणा
हिंजवडीतील ताज्या घटनेने हा प्रश्न पुन्हा अधोरेखित केला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कामाच्या ठिकाणी होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केल्याने या घटनेकडे केवळ एक आत्महत्या म्हणून नाही तर पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्यादृष्टीनेही पाहिले जात आहे. आयटी क्षेत्रातील वाढता ताण, टार्गेटसाठी दबाव, अंतर्गत स्पर्धा आणि नातेसंबंधातील तणाव यांचा कर्मचाऱ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
दररोज एकाहून अधिक पुरुषांची आत्महत्या
पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार मागील वर्षभरात सुमारे ५०० पुरुषांनी आत्महत्या केली आहे. याचा अर्थ दररोज एकाहून अधिक पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक घटनांमध्ये आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक कलह, पती-पत्नीतील वाद, प्रेमसंबंधातील तणाव, मानसिक नैराश्य, व्यसनाधीनता आणि नोकरीतील अस्थिरता ही कारणे समोर आली आहेत.
औद्योगिक पट्ट्यात तणाव
हिंजवडी, चाकण, भोसरी, तळवडे, रावेत, पिंपरी आणि औद्योगिक वसाहतींच्या परिसरात आत्महत्यांच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. औद्योगिक आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढती स्पर्धा, नोकरीची असुरक्षितता आणि दीर्घ कामाचे तास यांचा सामना करावा लागतो. यामुळे मानसिक तणाव वाढून काही जण नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.
वैवाहिक वादही ठरताहेत कारणीभूत
पोलिस तपासात अनेक वेळा वैवाहिक वाद, विभक्त राहण्याचे प्रश्न, कौटुंबिक संघर्ष आणि भावनिक तणाव ही कारणे समोर आली आहेत. काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद टाळल्याने किंवा मानसिक त्रास मनातच दडपून ठेवल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचेही आढळून आले आहे.
समाजात अजूनही पुरुषांनी आपल्या भावना व्यक्त करू नयेत, सर्व संकटांना खंबीरपणे सामोरे जावे, अशी अपेक्षा केली जाते. मात्र, पुरुषही मानसिकदृष्ट्या खचू शकतात. नैराश्य, चिंता, अपयश किंवा नातेसंबंधातील तणाव यांचा त्यांच्यावरही गंभीर परिणाम होतो. अनेक पुरुष मदत मागण्यास कचरतात. ही बाब धोकादायक आहे. मानसिक तणाव जाणवत असल्यास समुपदेशन घेणे आणि वेळेत उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
डॉ. मनजित संत्रे, मानसोपचारतज्ज्ञ, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, पिंपरी
आत्महत्यांच्या घटनांचा तपास करताना आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक कारणे सातत्याने समोर येतात. कोणतीही समस्या अंतिम नसते. कुटुंबीय, मित्र किंवा तज्ज्ञांशी संवाद साधल्यास अनेक समस्यांवर मार्ग निघू शकतो. मानसिक तणाव वाढत असल्यास मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड