ZP School  (Pudhari File Photo)
पिंपरी चिंचवड

PCMC Education Model: पालिका शाळांत दिल्लीनंतर आता लडाख पॅटर्न

व्यवहारिक अनुभवावर आधारित शिक्षण देण्याचे शिक्षण विभागाचे प्रयोजन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिल्ली येथील म्युन्सिपल स्कूलच्या धर्तीवर शिक्षण पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. आता, लडाख पॅटर्न राबविला जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी व शिक्षकांनी नुकताच लडाखचा अभ्यास दौरा केला आहे. या नव्या शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना कितपत लाभ होणार, याची उत्सुकता लागली आहे. (Latest Pimpari Chinchwad News)

तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिका शाळेत एकसुत्रता यावी म्हणून दिल्लीतील म्युन्सिपल स्कूलचा अंगीकार केला. त्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा दिल्लीत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. तीन ते चार वेगवेगळे अभ्यास दौरे झाले. त्यानुसार, महापालिका शाळांची इमारतींमध्ये बदल करून रंगरंगती व नामफलक एकसारखे करण्यात आले. तसेच, वर्गाची रचना व बाकांची रचना एक समान करण्यात आली. तसेच, अनेक बदल करण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकांना शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षणही देण्यात आले. त्यासाठी एका एजन्सीचे सहाय घेण्यात आले. दिल्लीच्या म्युन्सिपल स्कूलप्रमाणे महापालिका शाळेत सुधारणा करून शिक्षणपद्धती राबविली जात आहे.

असे असताना आता, लडाख येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धती महापालिका शाळेत आणण्याचे नियोजन सुरू झाले आहे. सोनम वांगचुक यांनी लडाख येथे सन 1988 मध्ये स्टुडंट्स एज्युकेशनल अ‍ॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) ही नापास विद्यार्थ्यांची शाळा सुरू केली. ती शाळा व्यावहारीक अनुभवावर आधारीत आहे. त्यात मातृभाषेत शिक्षण दिले जाते. वांगचुक यांनी गीतांजली अंगमो यांच्यासोबत हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख (एचआयएएल)ची स्थापना केली आहे. वांगचुक यांनी सुरू केलेली शिक्षण पद्धत महापालिका शाळेत सुरू करण्याचे अधिकार्‍यांचे नियोजन आहे.

त्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी, संगीता बागर व 25 शिक्षक लडाख येथे गेले होते. तेथील शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण 25 शिक्षकांनी घेतले आहे. ते शिक्षक महापालिकेच्या शाळेतील उर्वरित शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर टप्पा टप्प्याने नवीन शिक्षक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. त्यासाठी पुन्हा मोठा खर्च केला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पंचवीस शिक्षकांना प्रशिक्षण

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लडाख येथील शाळेला महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षकांनी नुकतीच भेट दिली. एकूण 25 शिक्षकांना तेथे प्रशिक्षण देण्यात आले. ते शिक्षक उर्वरित शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. लडाख येथील शिक्षणाची नवीन पद्धत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमासोबत व्यावहारिक ज्ञानात भर पडणार आहे, असे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले.

इंदूर पॅटर्नही

तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन कार्यपद्धती पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू केली. त्या अंतर्गत घराघरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा स्वीकारला जात आहे. त्यासाठी घंटागाडीसोबत जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवक नेमले आहेत. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT