पाणीटंचाईचे संकट File Photo
पिंपरी चिंचवड

PCMC Water Meter: पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडमध्ये! अनधिकृत नळजोडणीस पाणी मीटर

विरोध केल्यास पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

शहरातील नळजोड स्थिती

  • 30 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोड

  • आत्तापर्यंत 2 हजार 500 अनधिकृत

  • नळजोडणीस पाणी मीटर बसविले

  • एकूण 2 लाख निवासी व बिगरनिवासी अधिकृत नळजोड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन व व्यवस्थापन सुधारण्यासाठी अनधिकृत नळजोडास पाणी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. चोरून घेतलेल्या नळजोडास मीटर बसविण्यास काही माजी नगरसेवक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तसेच, झोपडपट्टीतील दादा मंडळी विरोध करीत आहेत. अशा व्यक्तींवर थेट पाणीचोरीचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. (Latets Pimpari chinchwad News)

शहराची वाढती लोकसंख्या व मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता, शहरातील पाणीपुरवठ्याचे अचूक नियोजन करण्यात येत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचा हिशोब ठेवण्यासाठी, पाण्याची गळती रोखण्यासाठी आणि अनधिकृत वापर टाळण्यासाठी, महापालिकेने सर्व प्रकारच्या नळजोडण्यांवर पाणी मीटर बसविण्याची कार्यवाही पाणीपुरवठा विभागाने मोहीम सुरू केली आहे. त्यात शहरातील प्रत्येक पाणीपट्टीधारकाची माहिती गोळा केली जात आहे. तसेच, अनधिकृत नळजोडणी अधिकृत केली जात आहे.

शहरात 30 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोड असल्याचा अंदाज आहे. तब्बल 30 टक्के पाण्याची चोरी होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या बेहिशोबी पाण्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी, शहरातील काही भागांस पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. पाणीचोरी व गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा पाणी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

घरगुती वापरासाठी मीटर व नळजोडणीचा खर्च पाणीपट्टीधारकांकडून पाणीबिलातून हप्त्याने वसूल करण्यात येते. आत्तापर्यंत 2 हजार 500 अनधिकृत नळजोडणीस पाणी मीटर बसविण्यात आले आहेत.

मात्र, काही ठिकाणी पाणी मीटर लावण्यास विरोध केला जात आहे. अनधिकृत नळजोडास पाणी मीटर बसविण्यास शहरातील काही माजी नगरसेवक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तसेच, झोपडपट्टीतील दादा मंडळी व समूह विरोध करीत आहेत. अशा व्यक्तींवर थेट पाणीचोरीचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या पुढे पाणीचोरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

हॉटेल, वॉशिंग सेंटर, बांधकामांवर वॉच

शहरातील घरगुती नळजोड तसेच, शहरातील व्यावसायिक पाणी वापरावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हॉटेल्स, वॉशिंग सेंटर्स, बांधकामे, आर. ओ. प्लांट्‌‍स, रेस्टॉरंट्‌‍स आणि इतर सर्व व्यावसायिकांनी पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत व्यावसायिक वापर तात्काळ थांबवावा. ज्यांनी अनधिकृत नळजोडणी घेतली आहे, त्यांनी ती त्वरित नियमित करून मीटर बसवावे. अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

पाणी मीटरमुळे पाणी वापराची अचूक आकडेवारी

पिंपरी-चिंचवड शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला जाणे आवश्यक आहे. मीटरमुळे पाणी वापराची अचूक आकडेवारी मिळेल. त्यामुळे पुरवठ्याचे नियोजन करणे व अपव्यय टाळणे शक्य होईल. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून मीटर बसवून घ्यावेत. अनधिकृत नळजोडणीस पाणी मीटर लावण्यास विरोध करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करा. ते नळजोड कायमस्वरूपी तोडा, असे निर्देश पाणीपुरवठा विभागास दिले आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT