PCMC Grand Marathon Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Grand Marathon: पिंपरी-चिंचवडमध्ये १० जानेवारीला पहिली आंतरराष्ट्रीय ग्रॅण्ड मॅरेथॉन; २२ परदेशी धावपटूंचा सहभाग

महापालिकेकडून ‘पीसीएमसी ग्रॅण्ड मॅरेथॉन’चे आयोजन; बिबट्या शुभंकर आणि टी-शर्टचे अनावरण, स्पर्धा दरवर्षी होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्यांदाच पीसीएमसी ग्रॅण्ड मॅरेथॉन ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा १० जानेवारीला आयोजित केली आहे. त्यात २० ते २२ आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा यापुढे दरवर्षी आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेचे टी शर्ट आणि शुभंकर बिबट्याचे अनावरण महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १९) करण्यात आले.

महापालिकेतील मुधकरराव पवळे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला उपमाहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेवक धर्मराज तंतरपाळे, योगेश लांडगे, शाम जगताप, तानाजी बारणे, उपायुक्त पंकज पाटील, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

ही स्पर्धा दरवर्षी १० जानेवारीला आयोजित केली जाणार आहे. स्पर्धा ४२ किमी अंतर, पूर्ण मॅरेथॉन २१ किमी अंतर, अर्ध मॅरेथॉन १० किमी आणि ५ किमी धावणे असे चार वेगवेगळ्या गटांत होणार आहे. रावेत येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय येथून स्पर्धा सुरू होऊन तेथेच संपेल. पुणे ग्रॅण्ड टूर आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीचा मार्ग तसेच, बीआरटीएस मार्गावरून ही शर्यत जाणार आहे. महापौर लांडगे व आयुक्त सूर्यवंशी यांच्या हस्ते स्पर्धेचे टी शर्ट व शुभंकर बिबट्याचे अनावरण करण्यात आले.

आयुक्त सूर्यवंशी म्हणाले, की या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी १० जानेवारी ही तारीख राखीव असणार आहे. पुणे सायकल ग्रॅण्ट टूर शर्यतीसाठी केलेल्या सुशोभित मार्गावरून मॅरेथॉन जाणार आहे. स्पर्धेत २० ते २२ आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेनंतर मुंबईची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होणार असल्याने या स्पर्धेत चाचणी म्हणून अनेक नामवंत धावपटू सहभागी होण्याची शक्यता आहे. स्पर्धाला वर्ल्ड ॲथलॅटिक्सची मान्यता आहे, असा दावा आयुक्तांनी केला आहे.

मॅरेथॉनला दुष्काळाशी जोडणे हास्यास्पद

महापालिकेने आयोजित केलेल्या नाट्य कार्यक्रमांसाठी २५ लाखांचा खर्च, तर मॅरेथॉनला ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मॅरेथॉनचा खर्च पुरस्कर्त्याच्या देगणीतून केला जाणार आहे. त्या खर्चाला राज्यातील दुष्काळ स्थिती व महापालिकेच्या विविध कामांसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाशी जोडणे हास्यास्पद आहे. दुष्काळाच्या कारणामुळे ही स्पर्धा न घेतल्यास दहा जानेवारी ही तारीख पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी रद्द केली जाईल. ती आपल्याला पुन्हा मिळणार आहे, असा दावा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी केला आहे.

महापालिका आर्थिक बळकट असल्याचा दावा: आयुक्त

महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बळकट आहे. महापालिकेकडे तब्बल ६ हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. महापालिका तसेच, विकासकामांचे सर्व खर्च व्यवस्थितपणे केले जात आहेत. पाणीपुरवठा व ड्रेनेजलाईन या कामांसाठी कर्ज घेतले जात आहे. ते ही खूप कमी आहे. महापालिकेची यापेक्षा अधिक कर्ज घेण्याची व ती फेडण्याची क्षमता आहे. जुने कर्ज व्यवस्थितपणे फेडले जात आहे, असा दावा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT