PCMC Garbage Crisis Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Garbage Crisis: मोशी डेपो दुर्घटनेचा फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा कोंडी, क्षेत्रीय कार्यालयांत साठू लागले ढीग

कचरा गाड्यांचा मार्ग बंद झाल्याने संकलन व्यवस्था कोलमडली; पूरग्रस्त भागातील कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी डेपोतील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. शहरातील कचरा संकलनाचे नियोजन कोलमडले आहे. अनेक भागातील कचरा संकलन झाले नाही. डेपोवर कचरा गाड्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने आता तात्पुरत्या स्वरुपात क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कचरा साठवण्यात येत आहे. त्यामुळे कचरा हस्तांतरण व विलगीकरण केंद्रात कचराचे ढीग दिसून येत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घंटागाडीद्वारे जमा केला जातो. तो कचरा मोशी डेपोत कॅप्सूल वाहनांद्वारे नेऊन टाकला जातो. मोशीतील कचर्‍याचे डोंगर पडल्याने तेथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळली आहे. ढिगार्‍याखाली अद्यापही आठ जण अडकले असून, शोधमोहिम सुरू आहे. रस्ता बंद आहे. कचर्‍याच्या वाहनांना तेथे जाता येत नाही.

त्यामुळे महापालिकेला कचरा ठेवण्यासाठी तात्पुरत्या जागांचा शोध घ्यावा लागत आहे. गुरुवारी घरोघरचा कचरा संकलन करण्याचे नियोजन गुरूवारी (दि. 9) आणि शुक्रवारी (दि. 10) कोलमडले. काही भागांमध्ये नियोजित वेळेपेक्षा अतिशय विलंबाने घंटागाडी आली. अनेक भागात कचरा संकलनासाठी घंटागाडीच आली नाही. त्यामुळे घरातील कचराच उचलण्यात आला नाही. जागा नसल्याने घंटागाड्या कचर्‍यासह क्षेत्रीय कार्यालयात उभारण्यात आल्या आहेत. तर, कचरा हस्तांतरण केंद्र आणि विलगीकरण केंद्रात तात्पुरता कचरा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे त्या भागात कचर्‍याचे ढीग तयार झाले आहेत.

अनेक भागांत पुरामुळे निर्माण झालेला कचरा तसाच

पावसामुळे पूर निर्माण झाल्याने अनेक घरे, हाऊसिंग सोसायट्या, बंगले, दुकाने, कार्यालये, आस्थापनांत पाणी शिरले. पूर ओसल्यानंतर घर, कार्यालय व दुकानांतील साहित्य खराब झाले. ते खराब झालेले फर्निचर, खुर्च्या, सोफा, कपाट, भांडी, गाद्या, कपडे, धान्यांची पोती, बंद पडलेली वाहने आदी साहित्य रस्त्यावर आणून टाकण्यात आले आहे. खराब झालेले साहित्य तसेच, चिखल पूर ओसल्यानंतर चार दिवसांनंतरही अद्याप कायम आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. मोशी दुर्घटना तसेच, पालखी सोहळ्यामुळे ती घाण साफ करण्यास विलंब झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

क्षेत्रीय कार्यालयात तात्पुरता कचरा जमा

मोशी डेपोत कचरा वाहनांना जाण्यासाठी रस्ता नाही. बचाव कार्याला किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये कचरा साठविण्यात येत आहे. त्यासाठी पाच क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जागा शोधल्या असून, अ, ब आणि ग या कार्यालय हद्दीत जागांचा शोध सुरु आहे. मोशी डेपोत वाहने जाण्यासाठी रस्ता झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात साठवलेला कचरा उचलण्यात येणार आहे. पालखी मार्गाची स्वच्छता, डेपोवर जाण्यासाठी जागा नसल्याने

गुरुवारी कचरा संकलनाचे नियोजन विस्कळीत झाले

होते. त्यात आता सुधाणारणा झाली आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT