पिंपरी: पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी नऊ वर्षांनंतर गुरुवारी (दि.15) रोजी मतदान झाले. सरासरी 58 टक्के मतदान झाले. ईव्हीएम मशिनमध्ये राजकीय पक्षांसह बंडखोर व अपक्ष अशा 692 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे. सर्व 32 प्रभागांची मतमोजणी एकाचवेळी विविध आठ ठिकाणी शुक्रवार (दि. 16) सकाळी दहापासून सुरू केली जाणार आहे.
दुपारी दोनपर्यंत सर्व 126 जागांचे निकाल घोषित करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. भाजपा सत्ता राखणार की, गेल्या निवडणुकीत निसटलेली सत्ता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग््रेास पुन्हा काबीज करणार, याची उत्सुकता शहरात निर्माण झाली असून, शहरात नेमकं वारं कुणाचं? हे आज मतमोजणीतून सिद्ध होईल.
चार सदस्यीय 32 प्रभागांच्या एकूण 126 जागांसाठी गुरुवार (दि. 15) मतदान पार पडले. मतदानास सकाळी 7.30 पासून संथ गतीने सुरुवात झाली. दुपारनंतर प्रतिसाद वाढल्याने अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी चारनंतर त्यात मोठी भर पडली. त्यामुळे काही भागांतील मतदान केंद्र गर्दीने भरून गेली होती. त्यामुळे तीन ते चार केंद्रांवरील मतदान प्रक्रिया रात्री उशिरा साडेनऊपर्यंत सुरू होती. तर, काही केंद्रांवरील ईव्हीएम मशिन वेळेवर सुरू न झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. काही भागांत भांडणे व वादविवादाचे प्रसंग घडले.
नावे यादीत सापडत नसल्याने अनेक मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. कुटुबांती सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. उत्साही मतदार मतदानानंतर सेल्फी घेत होते. मोबाईल स्वीकारण्यासाठी प्रथमच महापालिकेने व्यवस्था केली होती. नावीन्यपूर्ण मतदान केंद्र आणि महिलाचे गुलाबी रंंगातील मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे मतदारांचा उत्साह वाढला होता. केंद्रांबाहेरील गर्दी, बेशिस्त पार्किंग, उमेदवारांचे समर्थकांची घोळका आदीमुळे अनेक भागांत वाहतूककोंडी निर्माण झाली होती. मतदानात एकूण 126 जागांसाठी 692 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमध्ये सील झाले आहे.
मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएमपीएल बसने सर्व ईव्हीएम मशिन शहरातील आठ ठिकाणच्या स्ट्राँग रूमवर कडेकोट पोलिस बंदोबस्तात जमा करण्यात आल्या. तेथे पोलिसांचा कडा पाहरा ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूमच्या ठिकाणीच शुक्रवारी (दि. 16) सकाळी दहापासून मतमोजणी केली जाणार आहे. दुपारी दोनपर्यंत सर्व निकाल घोषित करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. भाजपाचे कारभारी महापालिकेची सत्ता आपल्याकडे राखण्यास यशस्वी होणार का, आक्रमकपणे प्रचार करणाऱ्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग््रेास फेबुवारी 2017 ला हातातून निसटलेली सत्ता पुन्हा काबीज करणार का, असा प्रश्न शहरातून उपस्थित केला जात आहे. ती उत्सुकता शुक्रवारी दुपारी संपेल.