पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजना आराखड्यावर (डीपी प्लान) प्राप्त झालेल्या 56 हजार 779 हरकतींवर सुनावणी घेण्यात आहे. आत्तापर्यंत शहरातील निम्म्या भागांतील हरकतींवर सुनावणी झाली आहे. सोमवारपासून (दि.21) भोसरी, डुडुळगाव आणि चिखली येथील हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.
महापालिकेकडून सुधारित प्रारुप विकास योजना आराखडा 15 मे 2025 ला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर 14 जुलै 2025 पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या. आराखड्यावर 56 हजार 779 जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींवर आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात 3 ऑगस्टपासून सुनावणी सुरु झाली आहे. सात सदस्यीय समितीच्या माध्यमातून हरकतींवर सुनावणी सुरु आहे. एकाच विषयाबाबत अनेक हरकती आहेत. काही आरक्षणांवर गठ्ठेच्या गठ्ठे हरकती आहेत. हरकतदाराचे संपूर्ण म्हणणे ऐकूण घेतले जात आहे. नोव्हेंबरअखेर संपूर्ण हरकतींवरील सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
आत्तापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक हरकतींवरील सुनावणी झाली आहे. पिंपरी, तळवडे, थेरगाव, रहाटणी, दिघी, मोशी, ताथवडे या सात भागांतील 28 हजार 725 हरकतींवर सुनावणी झाली आहे. नोव्हेंबरअखेर सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक सुट्यांमुळे काही दिवस सुनावणी बंद होती. सोमवारपासून भोसरी भागाची दोन दिवस सुनावणी आहे. त्यानंतर दोन दिवस डुडुळगाव भागाची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर आठवडाभर चिखली परिसरातील हकरतींवर सुनावणी आहे. त्या भागांतील हरकतींचे प्रमाण मोठे असल्याने त्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. चिखली परिसरासाठी तब्बल 4 हजार 318 हरकती दाखल आहेत.
दरम्यान, नोटीस मिळाल्यानंतर काही नागरिक सुनावणीला गैरहजर होते. अशा नागरिकांना संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर पुन्हा संधी दिली जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार असल्याचे नगररचना विभागाने सांगितले. पंधरा डिसेंबर 2026 पर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून डीपी अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
रिंगरोडच्या हरकतींवर नागरिकांचा सर्वाधिक प्रतिसाद
थेरगाव भागातून एचसीएमआर (रिंगरोड) मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच प्रशस्त रस्तांचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याच्या विरोधात मोठ्या संख्येने हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतीवर सुनावणीसाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. संपूर्ण ग. दि. माडगूळकर नाट्यगृह नागरिकांनी भरले होते. तसेच, मोशी येथील प्रस्तावित आरक्षणाबाबत नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यात खासगी जागेतील आरक्षणांबाबत अनेक हरकती होत्या.
असे आहे सुनावणीचे वेळापत्रक
भोसरी परिसर : सोमवार (दि.21) व मंगळवार (दि.22)
डुडुळगाव परिसर : गुरुवारी (दि.24)
चिखली परिसर : 28 व 29 सप्टेंबर, 1, 5 आणि 6 ऑक्टोबर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5