PCMC Commissioner YCM Hospital Visit Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Commissioner YCM Hospital Visit: आयुक्त डॉ. सूर्यवंशींची वायसीएम रुग्णालयाला अचानक भेट

आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा; समन्वयाने काम करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवार (दि. 2) सुटीच्या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास (वायसीएम ) अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, उपचार व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा तसेच, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, मेडिसिन विभाग, शस्त्रक्रिया विभाग, बालरोग विभाग, अस्थिरोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, दंतचिकित्सा विभाग, अल्ट्रासोनोग््रााफी विभाग, क्ष-किरण विभाग, डायलिसिस विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभाग तसेच, उष्माघात कक्षाची पाहणी केली. प्रत्येक विभागातील उपचार पद्धती, रुग्णसंख्या, वैद्यकीय सुविधा, उपलब्ध उपकरणे आणि सेवा व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती घेतली.

आयुक्तांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधत रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. रुग्णांनी त्यांना मिळत असलेल्या सेवा सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, तत्पर आणि नागरिकाभिमुख पद्धतीने देण्यासाठी आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी आयुक्तांना रुग्णालयातील विविध विभाग, उपलब्ध सुविधा, वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ तसेच भविष्यातील नियोजन याबाबत माहिती देत सादरीकरण केले.

वायसीएम रुग्णालय हे पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र असून, येथे पदव्युत्तर वैद्यकीय संस्था, बी.एस्सी. नर्सिंग संस्था, वायसीएम ब्लड सेंटर, मासुळकर नेत्र रुग्णालय, स्वतंत्र ॲम्ब्युलन्स केंद्र अशा विविध सुविधा नागरिकांना येथे दिल्या जातात. शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात वायसीएम रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या भेटीदरम्यान सह. प्राध्यापक डॉ. किशोर सूर्यवंशी, डॉ. मोहन वाघमारे, सिनियर सिस्टर शबनम सय्यद व कर्मचारी

उपस्थित होते. वायसीएम रुग्णालयाला भेट देऊन येथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेल्या सेवा समाधानकारण असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी केली. रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांनी विविध विभागांची कार्यपद्धती, उपचार सेवा, उपलब्ध सुविधा आणि रुग्ण व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती घेतली. वायसीएम रुग्णालयामार्फत नागरिकांना अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत, असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.

सर्वांनी समन्वयाने काम करावे

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे तसेच उपलब्ध सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT