पिंपरी: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून 22 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती व विविध विषय समितीच्या सभा होत नसल्याने महिनाभर महापालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. आचारसंहिता गुरुवार (दि.29) संपणार असल्याने त्या दिवसापासून महापालिकेचे कामकाज सुरळीत चालेल, अशी अपेक्षा नागरिकांसह, सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 22 सप्टेंबरपासून महापालिकेत आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे महापौर रवी लांडगे यांच्यासह सर्व पदाधिकार्यांची वाहने काढून घेण्यात आली. आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा, स्थायी समिती आणि विविध विषय समितीच्या सभेचा कामकाज ठप्प झाले होते. कामे होत नसल्याने नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक वैतागले होते. अनेक निर्णय सभा होत नसल्याने अडकून पडले होते. आचारसंहिता महिन्याभरानंतर गुरूवारी संपणार असल्याने महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
एसआयआर, निवडणुकीमुळे महापालिकेचे कामकाज विस्कळीत
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता मे व जून महिन्यात लागली होती. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. तसेच, जणगणना आणि मतदार पडताळणी (एसआयआर) मोहिमेसाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांची मोठ्या संख्येने नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्या राष्ट्रीय कामकाजात मनुष्यबळ व्यस्त असल्याने महापालिकेचे कामकाज जवळजवळ थंडावले होते. त्यानंतर पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या आचारसंहिता तसेच, मत मोजणीसाठी बहुतांश अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्त करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेचे कामकाज पूर्णपणे कोलमडले होते.
आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता
भारत निवडणूक आयोगाने पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 22 सप्टेंबरला जाहीर केला होता. बुधवार (दि.28) मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागला आहे. त्यामुळे गुरूवार (दि.29) आचारसंहिता शिथिल होऊ शकते. परिणामी, शुक्रवार (दि.30) तहकूब सर्वसाधारण सभा नियमितपणे घेता येईल. तसेच, इतर सभा व कामकाज करता येईल, असे महापालिकेचे नगर सचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.
महापालिकेची अनेक कामे ठप्प
आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे आणणे, धरणाजवळ जॅकवेल बांधणे या कामाची निविदा प्रक्रिया अडकून पडली आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील मुख्यमंत्र्यांसमवेतची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म येथील उड्डाण पुल वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय रखडला आहे. तेथील भुयारी मार्गाची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मोशी कचरा डेपोतील ओल्या कचर्यापासून बायो-सीएनजी प्रकल्पांची निविदा मंजुरीअभावी पडून आहे. थेरगाव येथील कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन झालेले नाही. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची भूमिपूजन प्रलंबित आहे. शहरात दहा ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या सुरू करण्याची प्रक्रिया संथ झाली आहे. महापालिकेच्या वतीने संगम हे सेवा व सुविधा असलेले मोबाईल अॅपचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांची दुरस्ती व सुशोभिकरणाची निविदा अडकून पडली आहे. यासह अनेक लहान व मोठी कामे अडकून पडली आहेत. आचारसंहिता उठल्याने ती कामांना गती मिळणार आहे.