पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत विविध सात राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष स्वत: उमेदवार होते. भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पॅनलमधील तीन नगरसेवकांना विजयी केले. तसेच, महापालिकेत पक्षाची पुन्हा सत्ता आणली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी संपूर्ण पॅनल विजयी केले.
शिवसेना (एकनाथ शिंदे ) आणि आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्षही विजयी झाले आहेत. तर, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व आम आदमी पार्टी पक्षाच्या तीन शहराध्यक्षांना पराभवास सामोरे लागले. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे उमेदवार आहेत. ते तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आहे. त्यांच्या पॅनलमधील अनिता काटे, कुंदा भिसे या विजयी झाल्या आहेत.
संत तुकारामनगर, कासारवाडी, विशाल थिएटर प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या पॅनलमधील मनीषा शाम लांडे, जितेंद्र ननावरे व वर्षा जगताप हे चारही जण विजयी झाले आहेत. त्यांनी पॅनेलने भाजपाचा पराभव केला.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख नीलेश तरस यांनी रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 येथून पहिल्यांदाच निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात ते नगरसेवक झाले आहेत. त्यांच्यासह त्या पॅनलमधील रेश्मा कातळे व ऐश्वर्या तरस असे तिघे जण विजयी झाले आहेत. वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 25 मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. ते भाजपाच्या तिकीटावर रिंगणात होते. तसेच, धर्मराज तंतरपाळे हे विजयी झाले आहेत. मात्र, भाजपा-आरपीआयचे कमलेश वाळके, चंद्रकांता सोनकांबळे व मोनिका निकाळजे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
निगडी, यमुनानगर प्रभाग क्रमांक 13 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तिसऱ्यांदा लढत होते. मात्र, त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. यंदा पक्षाचा एकही नगरसेवक होऊ शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड प्रभाग क्रमांक 26 मधून लढत होते. मात्र, त्यांना दुसऱ्यांदा नगरसेवक होत आले नाही. तसेच, शहरात पक्षाचा एकही नगरसेवक विजयी झालेला नाही. प्रभाग क्रमांक 26 मधून आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे हे ही पराभूत झाले आहे.