Mapping Pudhari
पिंपरी चिंचवड

PC Shield App: पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘पीसी शील्ड’ ॲप; 1,585 सराईत गुन्हेगारांचे मॅपिंग पूर्ण

डिजिटल पोलिसिंगकडे पाऊल; गुन्हे नियंत्रण, गस्त आणि प्रतिसादाचा वेग वाढणार

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस यांनी ‌‘पीसी शील्ड‌’ नावाचे अत्याधुनिक मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून पोलिसिंग अधिक गतिमान, पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे शहरातील सराईत गुन्हेगारांच्या घरांचे मॅपिंग करण्याचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत 1,585 गुन्हेगारांच्या घरांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे.

पेट्रोलिंगपासून उत्सव बंदोबस्तापर्यंत सर्व अपडेट्‌‍स

पीसी शील्ड ॲपमध्ये पेट्रोलिंग, आरोपी तपासणी, दामिनी पथक, नाकाबंदी, व्हिजिबल पोलिसिंग यासह महत्त्वाचे सण-उत्सव, निवडणुका आणि विशेष बंदोबस्त याबाबतची अद्ययावत माहिती रिअल-टाइम स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. यामुळे फिल्डवरील अधिकाऱ्यांना सूचनांची देवाणघेवाण जलद होऊन समन्वय वाढणार आहे.

प्रतिसादाचा वेग वाढणार

गुन्हेगारांचे मॅपिंग आणि डेटाबेसमुळे संशयितांची छाननी अधिक अचूक होणार आहे. एखाद्या घटनेनंतर सर्वांत जवळचे संशयित, त्यांचा इतिहास आणि लोकेशन त्वरित तपासता येणार असल्याने घटनास्थळी प्रतिसादाचा वेग वाढेल, तसेच तपास अधिक नेमका होईल.

गस्तीकडे दुर्लक्ष भोवणार

पीसी शील्ड ॲपमुळे शहरातील गस्तीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा थेट आणि सातत्यपूर्ण डिजिटल वॉच राहणार आहे. गस्तीवर असलेले मार्शल किंवा पोलिस कर्मचारी यांनी सराईत गुन्हेगारांच्या घरी किती वेळा, केव्हा आणि कोणत्या कालावधीत भेट दिली, याची सविस्तर नोंद ॲपमध्ये आपोआप अपडेट होणार आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी तपासणार असून, गस्तीतील निष्काळजीपणा, औपचारिक भेटी किंवा दुर्लक्ष याला आळा बसणार आहे.

एका क्लिकवर संपूर्ण माहिती

पीसी शील्ड ॲपमुळे पोलिस अधिकाऱ्यांना एका क्लिकवर आरोपीची इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये आरोपीचा फोटो, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे, गुन्ह्यांचा प्रकार, राहत्या घराचा अचूक पत्ता व नकाशावरील स्थान अशी सविस्तर माहिती समाविष्ट आहे. त्यामुळे शहरात नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून, स्थानिक माहिती नसतानाही ते तात्काळ कारवाईचे नियोजन करू शकणार आहेत.

मॅपिंगमुळे हॉटस्पॉट ओळखणे सोपे

गुन्हेगारांच्या घरांचे मॅपिंग झाल्याने गुन्हे हॉटस्पॉट्‌‍स ओळखणे सोपे होणार आहे. एखाद्या परिसरात संशयास्पद हालचाली, पुनरावृत्ती होणारे गुन्हे किंवा तक्रारींचे प्रमाण वाढल्यास, त्या भागात लक्ष केंद्रित पेट्रोलिंग आणि तत्काळ नाकाबंदी राबवता येणार आहे. परिणामी, प्रतिबंधात्मक कारवाई अधिक परिणामकारक ठरण्याची अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

डिजिटल पोलिसिंगकडे पाऊल

पीसी शील्ड हा उपक्रम डिजिटल पोलिसिंगकडे टाकलेले यशस्वी पाऊल मानले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होत असताना, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. आगामी काळात यामध्ये आणखी सुविधा समाविष्ट करण्याचा पोलिसांचा मानस आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने ‌‘पीसी शील्ड‌’ हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांच्या घरांचे मॅपिंग करण्यात येत असून, आतापर्यंत 1,585 गुन्हेगारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना आरोपीची संपूर्ण माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी, छायाचित्र व वास्तव्याचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. विशेषतः शहरात नव्याने नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे साधन उपयुक्त ठरणार आहे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT